नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक गोष्ट हटके असते. त्यांचा कपड्यांचा सेन्स असो वा मुलाखतीचे टायमिंग असो. ते त्यांच्या कृतीतून कायम चर्चेत असतात. अनेकदा ते सामान्यांमध्ये येऊन मिसळतात. त्यांच्याशी संवाद साधतात. लालकिल्ल्यावरील भाषणानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बोलतात. या सर्व गोष्टी त्यांचे वेगळेपण सिद्ध करतात. त्यांच्या या सरप्रायजिंग व्यक्तिमत्वाचा अजून एक नमुना दिल्लीकरांना अनुभवता आला. मोदी यांनी अचानकपणे मेट्रोतून प्रवास करत दिल्लीकरांना सुखद धक्का दिला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधला.
सध्या लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:चे संघटन मजबूत करत आहे. नवीन समीकरणे शोधण्यात येताहेत. अशात पंतप्रधान मोदी यांनी सामान्यांशी संवाद साधण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून मोदी यांनी मेट्रातून प्रवास केल्याचे बोलले जात आहे. मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेली दिल्ली मेट्रो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शुक्रवारी दिल्ली विद्यापीठात पोहोचण्यासाठी मोदींनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला.
दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा या समारंभाचे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिल्ली मेट्रोमधील पंतप्रधानांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. मेट्रोतील एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवाशांशी संवाद साधत असल्याचेही दिसून आले आहे. शुक्रवारी दिल्ली विद्यापीठात पंतप्रधान मोदी टेक्नॉलॉजी फॅकल्टी, कॉम्प्युटर सेंटर आणि एक शैक्षणिक ब्लॉक अशा तीन इमारतींची पायाभरणी करतील आणि कॉफी टेबल बुक्सच्या सेटचे प्रकाशन करणार आहेत.
नेटीझन्सने केले ट्रोल
पंतप्रधान मोदी यांची मेट्रोवारी सोशल मीडियावरदेखील बरीच गाजत आहे. काही नेटीझन्सनी मेट्रातील या संवादाला पीआर स्टंट म्हणत ट्रोल केले आहे. ‘तुमच्यासाठी प्रवाशांना थांबवून मेट्रो रिकामी करावी लागली असणार, स्टेशनवर गर्दी तर दिसतच नाही म्हणजे एकूण तुमचा हा स्टंट करायला प्रवाशांची कोंडी झाली असणार यात शंका नाही’, अशा अनेक कमेंट पंतप्रधान मोदी यांच्या मेट्रो प्रवासातील व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या पोस्टवर आहेत.