नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान केला. ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराची सुरुवात १९७५ मध्ये झाली. या पुरस्कारावर तारकेच्या समोरच्या बाजूस देवी अथेनाचे मस्तक कोरलेले असून “केवळ सदाचारींना सन्मानित केले जावे” अशा अर्थाचे वचन देखील लिहिलेले आहे.
ग्रीसच्या राष्ट्रपतींनी आजवर देशाचा सन्मान वाढवण्यात योगदान देणारे ग्रीसचे पंतप्रधान आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ प्रदान केला आहे. या पुरस्काराच्या पत्रकात म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतातील मैत्रीभाव जपणाऱ्या लोकांचा सन्मान केला जात आहे.”
या भेटीच्या निमित्ताने, अथकपणे आपल्या देशाची जागतिक पोहोच वाढवणाऱ्या, भारताच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी पद्धतशीरपणे काम करणाऱ्या आणि धाडसी सुधारणा घडवून आणणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीक राज्य सन्मान करते, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान एक मुत्सद्दी राजकारणी आहेत, ज्यांनी पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या मुद्दांना आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये जागा मिळवून दिली आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.
परस्पर हिताच्या क्षेत्रात ग्रीक-भारतीय मैत्रीच्या धोरणात्मक वाढीच्या कामात पंतप्रधान मोदी यांच्या निर्णायक योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे. पंतप्रधानांनी ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो, ग्रीसचे सरकार आणि ग्रीसची जनता यांचे आभार मानले आणि ते एक्स वर पोस्ट केले आहे.