नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12.15 च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणाची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास प्रयागराज येथे 6670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.
पंतप्रधान महाकुंभ मेळा 2025 साठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजमध्ये उत्तम वाहतूक सुविधा देण्यासाठी 10 नवीन रोड ओव्हर ब्रिज (RoBs) किंवा उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीकिनारी रस्ते यासारख्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश असेल.
गंगेच्या पाण्यात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा विसर्ग होऊ नये यासाठी नदीकडे जाणारे छोटे नाले अडवणे, वेगळे फाटे काढणे, अडवणे, प्रक्रिया करणे अशा विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान, स्वच्छ आणि निर्मळ गंगेसाठीच्या आपल्या वचनबद्धतेनुसार करतील. पिण्याचे पाणी आणि वीज यासंबंधीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटनही ते करणार आहेत.
पंतप्रधान प्रमुख मंदिरांच्या मार्गिकांचे उदघाटनही करणार आहेत. यात, भारद्वाज आश्रम, शृंगवरपूर धाम, अक्षयवट, हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करणे अधिक सोपे होईल आणि यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
पंतप्रधान कुंभ सहायक(Sah’AI’yak) चॅटबॉटचे देखील अनावरण करतील. महाकुंभ मेळा 2025 साठी येणाऱ्या भक्तांना कार्यक्रमांबद्दल अद्यावत माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तपशील प्रदान करेल.