वाराणसी (उत्तर प्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा मतदारक्षेत्र असलेल्या वाराणसीला १३ डिसेंबरपासून दौर्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान काशी विश्वनाथ संकुलाचे उद्घाटनही करणार आहेत. या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. परंतु या कार्यक्रमापूर्वी एक वाद निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौर्यापूर्वी काशी विश्वनाथ मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील सर्व भवनांना केशरी रंग दिला जात आहे. हे करताना येथील एका मशिदीलासुद्धा केशरी रंग दिल्याने वाद निर्माण झाला असून, यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर प्रशासनाकडून मशिदीला पुन्हा पांढरा रंग दिला जात आहे.
अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीचे मोहम्मद एजाज इस्लाही म्हणाले, की मशिदीला पूर्वी पांढरा रंग देण्यात आला होता. त्यावर केशरी रंग देण्यात आला. रंग देण्यापूर्वी कोणीही मशीद कमिटीशी चर्चा केली नाही. कट रचून मशिदीचा रंग बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याबद्दल काशी विश्वनाथ मंदिर कार्यालयात आक्षेपही नोंदविण्यात आला. जिल्हाधिकार्यांसमोर आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. नंतर प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आता मशिदीला पांढरा रंग दिला जात आहे.
वाराणसी विकास प्राधिकरणाचे सचिव आणि काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यपालक अधिकारी सुनील वर्मा म्हणाले, की एकरूपता दर्शविण्यासाठी विश्वनाथ मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील सर्व भवनांना एका रंगाने रंगविले जात आहे. परिसरातील बहुतांश इमारती बलुआ दगडाने बांधल्या आहेत. त्या दगडाचा रंग फिकट गुलाबी रंगासारखा आहे. हीच थिम गृहित धरून सर्व भवनांना रंगविले जात आहे.
या कार्यक्रमानिमित्त भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशभरातील तीन हजारांहून अधिक धर्माचार्य, संत तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे ५१ हजारांहून अधिक ठिकाणांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचा संबंध निवडणुकांशी जोडला जात आहे.