नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, या दुर्घटनेतील बाधितांना मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश ;
प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यातील दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्या भाविकांनी आपले कुटुंबीय गमावले, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. तसेच सर्व जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन तत्पर आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली असून, मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे.