मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्री नारायण कायम शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेताना दिसतात. त्यामुळे त्यांना धारेवर धरण्याची कुठलीच संधी शिवसेनेचे नेते सोडत नाहीत. विशेष म्हणजे यावेळी राणेंवर टिका करताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आधार घेतला आहे.
नारायण राणेंना एका प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दम मिळाल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. राणेंचे मंत्रीपद काढून टाकण्याचा इशारा मोदींनी दिला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नारायण राणेंवर ही वेळ त्यांच्या पीएमुळे आल्याचे राऊत म्हणतात. नारायण राणेंचा पिए ब्लॅकमेलिंग करतो आणि लोकांची फसवणुक करतो. त्याने अनेकांना मोठा आर्थिक गंडा घातला आहे. आणि ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे, असं राऊत म्हणतात. या पीएची तातडीने हकालपट्टी करा नाहीतर मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराच मोदींनी दिला असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. मुळात राणेंच्या पीएचं प्रकरण मोदींपर्यंत पोहोचणे आणि त्याची मोदींनी गंभीर दखल घेणे, यावर एकदम विश्वास बसणार नाही. पण विनायक राऊत यांनी पीएम टू पीए सांगितलेला हा प्रवास सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेला आला आहे.
लोकसभेतही जात नाहीत
नारायण राणे लोकसभेत जात नाहीत आणि संसदीय कामकाजात सहभागी होत नाहीत, असेही विनायक राऊत म्हणाले. त्यामुळे राणेंचे सत्तेतील दिवस भरत आले आहेत, असेच राऊतांना सूचवायचे आहे की काय, अशी चर्चा रंगत आहे.
राऊत विरुद्ध राणे
नारायण राणे मुळचे शिवसेनावासी. त्यामुळे त्यांना सेनेची संपूर्ण कार्यप्रणाली माहिती आहे. अशात ते सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर टिका करीत असतात. यामध्ये संजय राऊत विरुद्ध राणे, विनायक राऊत विरुद्ध राणे असा सामना रंगताना बरेचदा बघायला मिळतो. राऊत विरुद्ध राणेचा हा नवा सामना सध्या चांगलाच गाजतोय.
PM Modi Threat to Minister Narayan Rane
Shivsena MP Vinayak Raut Claim Politics