नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा)- इस्रायली हवाई दलाने इराणवर हवाई गुरुवारी रात्री हल्ले केले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अण्वस्त्र असलेल्या ठिकाणांना आणि लष्करी स्थळांना लक्ष्य केले. त्यानंतर इस्रायलने देशभरात विशेष आणीबाणी जाहीर केली असून इस्रायलमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहे.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी प्रदेशातील बदलत्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. चर्चेदरम्यान, पंतप्रधान नेतान्याहू यांनी मोदी यांना अलीकडील घडामोडींबद्दल माहिती दिली, तर पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीबद्दल भारताची चिंता व्यक्त केली. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर मोदी यांनी भर देत जागतिक शांतता प्रयत्नांप्रति भारताच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले: इस्रायलचे पंतप्रधान @netanyahu यांचा दूरध्वनी आला. त्यांनी मला तेथील बदलत्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. मी भारताकडून चिंता व्यक्त केली आणि प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.









