नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचे कौतुक केले आहे. कुठलेही संस्थात्मक अथवा शासकीय पाठबळ नसताना पर्यावरण रक्षणाच्या तीव्र कळकळीतून शहरातील नंदीनी नदीच्या प्रदुषणाविरोधात एकाकी लढा देत आहेत. नवरात्रीदरम्यान जमा होणारे शेकडो टन निर्माल्य नंदीनी नदीत फेकले जाऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत उंटवाडी पूलावर शिट्टी घेऊन उभे राहत जनजागृती करण्याचा शिरस्ता गेल्या सहा वर्षांपासून पाळत आहेत.
काय म्हणाले मोदी?
मित्रांनो,
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते.
https://twitter.com/PIBMumbai/status/1507972103315755008?s=20&t=1nney2buwZQnpisnUxP1Aw
कोण आहेत चंद्रकिशोर पाटील?
नवरात्रीतील पूजाअर्चनेमुळे घरात मोठ्या प्रमाणावर जमा झालेले निर्माल्य आणि घट दसऱ्यांच्या दिवशी लोक नदीत विसर्जीत करतात. त्यामुळे नदीची होणारी दूरवस्था पाहून अस्वस्थ झालेले पाटील नंदीनी नदीवरील उंटवाडी पूलावर दसऱ्याला दिवसभर शिटी घेऊन उभे राहू लागले. कुणी नदीत निर्माल्य टाकू लागले की पाटील शिटी मारून त्याचे लक्ष वेधून घेतात आणि नदीचे प्रदुषण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी संवाद साधतात. त्यात ते नदीची दूरवस्था, तेथील प्रदुषण दाखवून लोकांचे मन वळवतात. तरीही कुणी ऐकलेच नाही, तर नदीतील प्रदुषीत पाणी बाटलीत भरून त्या व्यक्तीला ते प्राशन करण्याची विनंती करून त्याला प्रदुषणाचा मुद्दा पटवून देतात. त्यांच्या या उपक्रमाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि शेकडो टन निर्माल्य नदीत जाण्याऐवजी पूलाच्या काठावर ते जमा होऊ लागले. सातत्याने पाच वर्षे हा उपक्रम सुरू असताना २०२० साली इंडियन फॉरेस्ट ऑफिसर श्वेता बड्डू यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. श्वेता यांनी त्याबाबत केलेल्या ट्वीटमुळे पाटील यांच्याकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले. देशभरातील वृत्तपत्र, रेडीओ, टीव्ही अशा विविध माध्यमांतून पाटील यांची दखल घेतली गेली. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या आणि राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या सोशल मिडीया हँडलवरही पाटील यांच्या प्रयत्नांना दाद दिलेली आहे. नंदीनी नदीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठीही पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते अनेकदा नंदीनी नदीपात्रात स्वच्छतेसाठी उतरलेले दिसतात. संक्रातीच्यावेळी फलक आणि शिल्पकृतींच्या माध्यमातून ‘नो नॉयलॉन मांजा’ ही जनजागृती मोहिमही ते दोन वर्षांपासून राबवित आहेत. गजानन महाराज प्रकट दिनाच्या औचित्यानेही पाटील हे पर्यावरण जनजागृती करणारे देखावे सादर करत असतात. यंदा विनाशाकडे नेणारा विकास कि शाश्वत विकास या संकल्पनेवर त्यांनी लहानग्यांच्या मदतीने अनोखा देखावा सादर केला होता. चंद्रकिशोर पाटील हे ‘नाशिक सिटीझन्स फोरम’च्या आउटस्टँडीग सिटीझन ऑफ नाशिक या पुरस्काराचे फेब्रुवारी महिन्याचे मानकरीही ठरले आहेत.