नवी दिल्ली – लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाला नमन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपुरवासियांकडे तीन आशिर्वाद मागितले. निमित्त होते, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या तीन विभागांचे भूमिपूजन. आज दुपारी हा सोहळा संपन्न झाला. त्यात पंतप्रधान मोदी हे ऑनलाईनरित्या सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (NH-965) पाच विभागांचे चौपदरीकरण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या (NH-965G), तीन विभागांचे भूमिपूजन संपन्न झाले. हे प्रकल्प पंढरपूरला भाविकांची ये-जा करणे सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात येत आहेत. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला ‘पालखी’ साठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्यामुळे भाविकांना विनाअडथळा आणि सुरक्षित रस्ता उपलब्ध होईल.
याप्रसंगी मोदींनी त्यांच्या भाषणात हिंदी आणि मराठीतून संवाद साधला. त्यामुळे उपस्थितांची त्यांनी मने जिंकली. पंढरपूरवासियांकडे तीन आशिर्वाद मागितले. मोदी म्हणाले की, आपल्याकडून मला हे आशिर्वाद मिळाले तर मी नक्कीच धन्य होईल. पालखी मार्गाच्या बाजूला मोठे डेरेदार वृक्ष लावावे, रस्त्याच्या दुतर्फा शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि पंढरपूरला स्वच्छ ठेवावे, हे तीन आशिर्वादच मला हवे आहेत, असे मोदी म्हणाले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
असा आहे हा प्रकल्प
दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे 6690 कोटी रुपये आणि सुमारे 4400 कोटी रुपये इतका आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी पंढरपूरचा विविध ठिकाणांहून संपर्क वाढविण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील 223 किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांची अंदाजे किंमत 1180कोटी रु. पेक्षा जास्त आहे. या प्रकल्पांमध्ये म्हसवड – पिलीव – पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी – पंढरपूर (NH 965C), पंढरपूर – सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर – मंगळवेढा – NH 5-A या रस्त्यांचा समावेश आहे. या समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. बघा, पंतप्रधान मोदी यांचे भाषणाचा व्हिडिओ
https://twitter.com/narendramodi/status/1457655169978535939