नवी दिल्ली – देशात पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी मल्टी मॉडल कनेक्टिव्हीटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन म्हणजे पीएम गती शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. येथील प्रगती मैदानावर नव्या प्रदर्शन परिसरातील सभागृहाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. या योजनेंतर्गत कोणत्याही योजनांची निर्मिती, आराखडा, भारतमाला, सागरमाला, आंदरदेशीय जलमार्ग, शुष्क भूमी, बंदरे, उड्डाणसारखे मंत्रालये आणि राज्य सरकारच्या पायाभूत सुविधांच्या परियोजना सहभागी होऊ शकणार आहेत.
पीएम गती शक्ती योजनेमुळे परियोजनांसाठी लागणारा खर्च आणि देखरेखीवरील खर्चात बचत होणार आहे. तसेच नव्या रोजगारांची निर्मिती होईल. रेल्वे, रस्त्यासह १६ मंत्रालयांशी निगडित एका डिजिटल मंचाद्वारे जवळपास १०० लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा परियोजनांच्या विकासाला गती मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी या योजनेची लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती.
लाल फितीत अडकणार नाही योजना
देशात अनेक ठिकाणी रस्ते तयार करून काही दिवसांनंतर केबल टाकण्यासाठी ते रस्ते खोदले जातात. वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी न मिळाल्याने शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतर अनेक प्रकल्प थांबतात. पीएम शक्ती योजनेच्या माध्यमातून अशा समस्या सोडविण्यासाठी मदत केली जाईल. त्यासाठी १६ मंत्रालयांचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये रेल्वे, रस्ते परिवहन, जहाज बांधणी, माहिती आणि तंत्रज्ञान, कापड, पेट्रोलियम, ऊर्जा, नागरी उड्डाण यासारख्या मंत्रालयांचा या गटात समावेश आहे. या मंत्रालयांतर्गत जे प्रकल्प सुरू आहेत, किंवा २०२४-२५ पर्यंत ज्या योजना पूर्ण करायच्या आहेत या सर्व योजनांचा समावेश गती शक्ती योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
उपग्रहाद्वारे देखरेख
या सर्व योजनांना एका नॅशनल मास्टर प्लॅनमध्ये समायोजित केले जाणार आहे. यामध्ये सर्व १६ मंत्रालयांचे संयुक्त सचिव स्तरावरील अधिकार तज्ज्ञ असतील. उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या ३ डी इमेजच्या माध्यमातून हे अधिकारी योजनांवर देखरेख ठेवून त्याचे मूल्यांकन करणार आहेत. तसेच संबंधित योजना त्वरित पूर्ण करण्यासाठी सल्लाही देतील.
पीएम गतीशक्ती सहा स्तंभावर आधारित आहे
1. सर्वसमावेशकता: हा आराखडा विविध मंत्रालये आणि विभागांचे विद्यमान आणि नियोजित उपक्रम एकाच केंद्रीकृत पोर्टलद्वारे सामावून घेणार आहे. प्रत्येक विभागाला आता एकमेकांचे कामकाज आणि उपक्रम पाहता येणार आहे आणि त्यांना सर्वसमावेशक पद्धतीने नियोजनासाठी आणि प्रकल्पांच्या कार्यान्वयनासाठी महत्त्वाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध होणार आहे.
2. प्राधान्यक्रमाची निश्चिती: या आराखड्याद्वारे विविध विभागांना परस्परांशी संवाद साधून आपल्या प्रकल्पांचे प्राधान्यक्रम ठरवता येणार आहेत.
3. सुयोग्य उपयोजन: विविध मंत्रालयांना आपल्या प्रकल्पांमधील त्रुटी दूर करून त्यांचे नियोजन करण्यात हा राष्ट्रीय मास्टर प्लॅन मदत करेल. एका भागातून दुसऱ्या भागात मालवाहतूक करण्यासाठी वेळ आणि पैसा या दोहोंची बचत करणारा सर्वात चांगला मार्ग ठरवण्यासाठी हा आराखडा मदत करेल.
4. तादात्म्य : वेगवेगळी मंत्रालये आणि विभाग बहुतेकदा आपापल्या कक्षांमध्येच राहून काम करत असतात. त्यामुळे नियोजन आणि अंमलबजावणीमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पांना विलंब होतो. प्रत्येक विभागाच्या कामांमध्ये त्याचबरोबर शासनाच्या विविध स्तराच्या कामांमध्ये समन्वय साधून तादात्म्य निर्माण करण्याचे काम पीएम गतीशक्ती करेल.
5. विश्लेषणात्मक : जीआयएस आधारित अवकाशीय नियोजन आणि 200 पेक्षा जास्त स्तर असलेली विश्लेषणात्मक साधने यांच्या सहाय्याने हा आराखडा एकाच ठिकाणी सर्व आकडेवारी उपलब्ध करून देईल त्यामुळे काम करणाऱ्या संस्थेसमोर अतिशय सुस्पष्ट चित्र निर्माण होईल.
6. गतीशील : सर्व मंत्रालये आणि विभाग जीआयएस प्लॅटफॉर्मद्वारे आता क्रॉस सेक्टर प्रकल्पांची प्रगती पाहू शकणार आहेत, त्यांचा आढावा घेता येणार आहे आणि त्यावर देखरेख ठेवता येणार आहे. उपग्रहांदवारे मिळालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर होत असलेल्या कामाची प्रगती पाहता येणार आहे आणि नियमितपणे या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. त्यामुळे मास्टर प्लॅन अद्ययावत करणे आणि प्रकल्पांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करणे शक्य होणार आहे.
पीएम गतीशक्ती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवसाय सुलभता आणि जीवन सुकर करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे. मल्टी मोडल कनेक्टिविटीमुळे लोकांना प्रवास करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची वाहतुकीच्या एका साधनातून दुसऱ्या साधनाद्वारे वाहतूक करण्यासाठी एकात्मिक आणि सुविहित कनेक्टिविटी उपलब्ध होणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा लाभ शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे शक्य होणार आहे.
पीएम गतीशक्ती आगामी काळात उदयाला येणारे कनेक्टिविटी प्रकल्प, इतर व्यापारी केंद्रे, औद्योगिक भाग आणि सभोवतालचे वातावरण यांची माहिती लोकांना आणि व्यावसायिकांच्या समुदायाला देईल. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे व्यवसाय आणि उद्योग यांची योग्य ठिकाणी उभारणी करण्यासाठी मदत मिळणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांचा लॉजिस्टिक खर्च कमी करुन आणि पुरवठा साखळीत सुधारणा करून त्याचबरोबर स्थानिक उद्योग आणि ग्राहक यांच्याशी योग्य प्रकारचा संपर्क प्रस्थापित करून त्यांची जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता वाढणार आहे.