नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या आणि बढती मिळालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा अभ्यास दिला आहे. त्यानुसार, हे सर्व मंत्री जनतेमध्ये जाऊन त्यांचे आशिर्वाद घेणारी यात्रा करणार आहेत. ही या६ा येत्या १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नुकतेच नव्याने समाविष्ट झालेले, तसेच बढती मिळालेले ३९ भाजपचे ३९ मंत्री १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहेत. या दरम्यान मंत्री २१२ लोकसभा मतदारसंघांना भेट देतील आणि १९,५६७ किलोमीटरचा प्रवास करतील. या दरम्यान ते जनतेचे आशीर्वाद घेत संवाद साधणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेमध्ये सर्व मंत्री तीन दिवस स्वतंत्रपणे प्रवास करणार असून राज्य मंत्री दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान यात्रेत सहभागी असतील, तर कॅबिनेट मंत्री १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान प्रवास करतील. गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर सरकारचा विचार आणि कार्य नवीन मंत्र्यांमार्फत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने ही भेट तथा यात्रा जाहीर केली आहे.
या यात्रेचे संचालन करणारे भाजप सरचिटणीस तरुण चुग यांनी सांगितले की, पक्षाने प्रत्येक नवीन मंत्र्याला स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त तीन लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये जाण्यास सांगितले आहे. तसेच ही यात्रा १९ राज्ये आणि २६५ जिल्ह्यांमधून जाईल. यावेळी मंत्री लोकांना भेटतील आणि सरकारच्या कामगिरीबद्दल माहिती सांगतील, विशेषतः गरीबांसाठी केलेल्या कामाबद्दल माहिती देतील.
भारतीय जनता पक्ष उत्तराखंडमध्ये दि. १७ ऑगस्टपासून आशीर्वाद यात्रेने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट हे प्रचाराची सुरुवात नैनीताल येथून हरिद्वारमधील नरसैन सीमा येथून करतील. यावेळी ही यात्रा मंगलोर, रूरकी, भगवानपूर, मोहन, दथ काली मंदिर मार्गे देहरादून येथील भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचेल. तसेच दि. १८ ऑगस्टला ही यात्रा ऋषिकेश आणि हरिद्वारकडे निघेल, तेथून ती उधम सिंह नगर, नैनीतालकडे जाईल आणि दुसऱ्या दिवशी अल्मोडा येथे तीचा समारोप होईल.