नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात केवळ एकाच दिवसात तब्बल १ लाख ५९ हजार नव्या कोरोना बाधित आढळल्याने त्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने आज यासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरित्या वाढला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह जवळपास सर्वच राज्यांमध्ये मोठ्या गतीने नवे कोरोना बाधित आढळून येत आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या अवतारामुळे संसर्ग फोफावत आहे. एकाच दिवसात जर दीड लाख रुग्ण नव्याने आढळले तर आठवड्याभरातच परिस्थिती चिंताजनक होऊ शकते. यासंदर्भात काय उपाययोजना करायच्या संदर्भात पंतप्रधान मोदी हे आजच्या बैठकीत चर्चा करणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काय करायला हवे, लसीकरण वाढविण्यासाठी कुठल्या बाबींचा विचार करायला हवा यासह अन्य उपाययोजनांबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची चिन्हे आहेत. आज दुपारी ४ वाजता ही बैठक होत असून त्यास आरोग्यमंत्री मनसुख मांडविय, गृहमंत्री अमित शाह, आरोग्य सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते भारतात तिसरी लाट सक्रीय झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान लॉकडाऊनचा निर्णय घेणार की कोरोना निर्बंध आणखी कडक करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभ्यासकांच्या मते अन्य देशातील स्थिती पाहता भारतात आणखी कठोर निर्बंध करणे आणि लसीकरण वाढविणे हे दोनच पर्याय आहेत. त्यावर या बैठकीत काय चर्चा होते आणि अंतिम निर्णय काय होतो, हेच महत्त्वाचे आहे.