नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कार्की त्यांच्या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि केंद्र सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमध्ये अलिकडेच झालेल्या निदर्शनांमध्ये झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये असलेले विशेष संबंध वृद्धिंगत करण्यासाठी जवळून काम करत राहण्याची भारताची तयारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच नेपाळ मधील जनतेच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याच्या नेपाळच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा असेल असे ते म्हणाले.
नेपाळला दर्शवलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या पंतप्रधानांच्या इच्छेला दुजोरा दिला. पंतप्रधानांनी नेपाळच्या आगामी राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.