इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
७९ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत यापुढे कोणत्याही अण्वस्त्र धमक्यांना भीक घालणार नाही असा सज्जड इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या सैन्य दलांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त कठोर प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या यशात सहभागी शूर वीरांना त्यांनी सलाम केला.
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देशात आक्रोशाची भावना होती; ऑपरेशन सिंदूर ही देशवासीयांच्या याच आक्रोशाची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. सिंधू जल करार भारतासाठी अन्यायकारक होता; असं सांगून रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहणार नाही असा परखड इशारा प्रधानमंत्र्यांनी दिला.
आत्मनिर्भरता हे विकसित भारताचं सामर्थ्य आहे, २१ वं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक आहे असं सांगून विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातल्या युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्वतंत्र भारतासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आता १४० कोटी भारतीयांनी समृद्ध भारताच्या उभारणीसाठी कार्यरत व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
अणु उर्जेच्या क्षेत्रात भारतानं मोठी प्रगती केली आहे. हवामान बदलाच्या आव्हानामुळे संपूर्ण जग चिंतीत आहे, भारतानं २०३० पर्यंत पन्नास टक्के स्वच्छ उर्जा निर्मितीचं उद्दिष ठेवलं होतं, हे उद्दिष्ट भारतानं पाच वर्ष आधीच पूर्ण केलं असं प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली. सुमारे १ लाख कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल. या अंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५, हजार रुपये मिळतील असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये सुधारणा केली जाईल, तसंच या दिवाळीला देशवासियांना एक मोठी भेट मिळणार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मच्छीमारांच्या हिताला तसंच वंचित वर्गाच्या हिताला सरकारचं प्राधान्य आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माणाचं कार्य करणाऱ्या आणि सेवा समर्पण आणि संघटन या संकल्पनेनुसार कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तान संघाच्या कार्याला त्यांनी वंदन केलं.
जन्माष्टमीच्या निमित्तानं सुदर्शन चक्र मोहिमेची घोषणा त्यांनी केली. येत्या २०३५ पर्यंत सार्वजनिक ठिकाणांना सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठीची ही मोहीम आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान, आत्मनिर्भरता, गुलामगिरीच्या मानसिकता सोडून स्वदेशीचा स्वीकार ही मूल्य प्रत्येकानं अंगीकारावीत, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.