इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२५ जुलै २०२५ – भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अभूतपूर्व दिवस. आज पंतप्रधान मोदीजींनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग ४०७८ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम करत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (१९६६ ते १९७७) यांच्या ४०७७ दिवसाच्या कार्यकाळाला त्यांनी मागे टाकलं आहे. ते भारताचे दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते ठरले आहेत. ते सुद्धा सलग आणि अखंड, भारतीय लोकशाहीत अशा सातत्यपूर्ण नेतृत्वाचं हे एक दुर्मीळ उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले आहे.
मोदीजींच्या जवळपास २४ वर्षांच्या राज्य व केंद्र सरकारमधील राजकीय प्रवासात त्यांनी अनेक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले पहिले पंतप्रधान, सर्वाधिक काळ सत्ता टिकवणारे काँग्रेसबाह्य पंतप्रधान, हिंदीतर भाषिक राज्यातून सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते, कांग्रेस व्यतिरिक्त सलग दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे आणि तिसऱ्यांदा बहुमतासह निवडून आलेले एकमेव नेता मोदी असल्याचेही भाजपने दावा केला आहे.
मोदी हे एकमेव असे नेते आहेत जे सलग ६ निवडणुका जिंकले आहेत – २००२, २००७, २०१२ गुजरात विधानसभा आणि २०१४, २०१९, २०२४ लोकसभा. हा प्रवास म्हणजे उत्तम नेतृत्व आणि जनतेचा विश्वासाचं प्रतीक आहे. मोदीजी खऱ्या अर्थाने इतिहासात अढळ स्थान प्राप्त करणारे नेते ठरले असल्याचेही भाजपने सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे.