नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णसंख्या दररोज तीन लाखांच्या आसपास गेली असून, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडालेला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन वेगवेगळ्या बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. देशातील सर्वाधिक प्रभावित राज्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. राज्यांतील कोरोना परिस्थितीचा ते सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेतील. तर दुपारी ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात आढावा घेतील.
कोरोनाग्रस्त राज्यांमध्ये ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुरवठा सुरळीत चालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा आल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते.
दरम्यान, ऑक्सिजनचा उपलब्ध साठा आणि पुरवठ्यासंदर्भात पंतप्रधान उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी बंगालमध्ये होणार्या चार प्रचारसभा पंतप्रधानांनी रद्द केल्या आहेत. देशात ऑक्सिजनच्या उपलब्धतेपेक्षा त्याचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, राज्यांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुधवारी (२१ एप्रिल) २० राज्यांकडून ६७८५ टन प्रतिदिन ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून या राज्यांना ६८२२ टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. याचा अर्थ ऑक्सिजनची उपलब्धता ही समस्या नसून तो रुग्णालयांमध्ये व्यवस्थित पोहोचतो की नाही, ही आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत होता. परंतु ऑक्सिजन पुरवल्यानंतर कोटा ठरवल्यानंतरही काही राज्य पुरवठ्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असून, ठिकठिकाणच्या ऑक्सिजन उत्पादन कंपन्यांवर स्थानिक रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी खोडा टाकणार्या अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.