पंतप्रधानांनी एप्रिलमध्ये कोरोनाशी संबंधित घेतल्या २१ बैठका
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (३० एप्रिल) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेतली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतरची मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काही मोठा निर्णय घेतला जातो का, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग बैठका घेतल्या आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी २१ बैठका घेतल्याची नोंद आहे. यातील काही बैठका गेल्या दोन आठवड्यातीलच आहेत. देशातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा आणि लशीच्या मुद्यांवर वेगवेगळ्या स्तरावर बैठका झाल्या.
मार्च २०२० नंतर पंतप्रधानांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठाकांची ही संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधानांनी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यादरम्यान अनेक बैठका झाल्या होत्या. कोरोना व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकारी स्तरावर १४ बैठका घेतल्या होत्या.
गेल्या महिन्यात झालेल्या २१ बैठकांमध्ये पंतप्रधानांनी केंद्राचे अधिरारी, राज्यांच्या मुख्यमंत्री, परदेशी नेत्यांशी चर्चा केली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माहितीनुसार, मार्च २०२० ते एप्रिल २०२१ च्या दरम्यान पंतप्रधान मोदी कमीत कमी ६५ अधिकारीक बैठकांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी कोरोनाबाबत तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतर स्टेकहोल्डर्स यांच्याशीसुद्धा चर्चा केली आहे. परंतु या बैठकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.