नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे राजे चार्ल्स III यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक संबंधांचे स्मरण करत दोन्ही नेत्यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.त्यांनी राष्ट्रकुल देश आणि अलीकडेच सॅमोआ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीबाबत परस्परांसोबत विचारविनिमय केला.
हवामान बदलाच्या परिणामांवरील उपाययोजना आणि शाश्वतता यांसह परस्पर हिताच्या अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. पंतप्रधानांनी या मुद्यांवर राजे चार्ल्स यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि पुढाकार यांची प्रशंसा केली आणि भारताने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
त्यांनी एकमेकांना आगामी काळातल्या नाताळ सणाच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ब्रिटनच्या राजांना उत्तम आरोग्य आणि निरामयतेच्या शुभेच्छा दिल्या.