इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोला/नांदेडः अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि कर्नाटकात वसुली होत आहे. या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले, असा आरोप करताना महाराष्ट्राला या घोटाळेबाजांचे एटीएम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मोदी म्हणाले, की जिथे काँग्रेसचे सरकार बनते, ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते. आजकाल हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक हे काँग्रेसच्या राजघराण्याचे ‘एटीएम’ बनले आहेत. येथील वसुली दुपटीने वाढली आहे. घोटाळ्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणारा काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करेल याची तुम्ही कल्पना करू शकता. महाराष्ट्राचा आशीर्वाद भाजपवर आहे. महाराष्ट्रात आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. महाआघाडीच्या बड्या घोटाळेबाजांचे महाराष्ट्र आम्ही एटीएम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची सेवा करण्याचा आनंद वेगळाच आहे. केंद्रात माझे सरकार येऊन केवळ पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत आम्ही महाराष्ट्रात अनेक योजना सुरू केल्या आहेत. गेल्या दोन टर्ममध्ये ४ कोटी घरे बांधली गेली. गरिबांसाठी आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील. महाराष्ट्रातील गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
महायुतीचे सरकार महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने पुढे नेणार आहे. आमच्यासाठी राष्ट्राची भावना ही सर्वात महत्त्वाची आहे. प्रथम राष्ट्राची भावना ही भारताची खरी ताकद आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की काँग्रेसला वेगवेगळ्या जातींमध्ये लढायचे आहे. देश जितका कमकुवत असेल तितकी काँग्रेस मजबूत होईल, हे काँग्रेस पक्षाला माहीत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या जातींना आपसात लढवायचे आहे आणि हा काँग्रेसचा स्वभाव आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने आमच्या दलित समाजाला कधीही एकत्र येऊ दिले नाही. एसटी समाजाला विविध जातींमध्ये विभागून ठेवले. ओबीसी हे नाव ऐकताच काँग्रेस चिडते. ओबीसी समाजाला वेगळी ओळख देऊ नये, त्यामुळेच काँग्रेसने विविध खेळ खेळले आहेत, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने एकापेक्षा एक घोटाळे केले. काँग्रेसने फसवणुकीत स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. काँग्रेसवाले देशात बाबासाहेबाचे नाही स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस वेगळी पुस्तिका दाखवून संविधानाची चेष्टा करीत आहेत. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तिटकारा आहे. संविधानासोबत सगळ्यात पहिला विश्वासघात काश्मीरमध्ये केला होता, अशा शब्दांत मोदी यांनी टीका केली.
मराठवाड्यात ११ सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचे हीत हे आमचे प्राधान्य आहे. नांदेडमध्ये ५ लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. समृद्धी महामार्गामुळे विकासाला नवी चालना मिळाली आहे. नांदेड ते दिली विमानसेवा सुरू झाली आहे. अमृतसर यात्रा विमानसेवा सुरू होणार आहे. ३ करोड महिलांना लखपती दीदी बनवत आहोत. गावातली माझी दीदी लखपती बनेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, की अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा आधार आहे; पण कापूस उत्पादक शेतकऱ्याला अनेक दशके या शेतीचा लाभ मिळाला नाही. ही परिस्थिती बदलत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना प्रोत्साहन दिले जात आहे.
“महाराष्ट्रात इतकी वर्ष काँग्रेसचे सरकार होते. विदर्भात पाणी संकट वाढत गेले. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केले? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहिले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले, त्यांना आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला, असा आरोप मोदी यांनी केला.