नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील हप्त्याचे वितरण करणार आहेत. या योजनेद्वारे १९,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार असून त्याचा लाभ ९ कोटी ७५ लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार आहेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी दोन हजार रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण सहा हजार रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १.३८ लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.