इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, वाशिम येथे त्यांनी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रधानमंत्री सकाळी यावेळी वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.
या दौ-यात त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित करण्यास प्रारंभ केला. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सन्मान योजनेच्या १८ व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता त्याचे वितरण सुरु झाले. त्यामुळे ९.४ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना एक वर्षात एकुण ६००० रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र शेतक-यांना आतापर्यंत १७ हप्त्यांमध्ये ३४ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात वाशिममध्ये प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे १९२० कोटी रुपयांचे ७५०० हून अधिक प्रकल्प समर्पित केले. तसेच, यावेळी बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.