नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारने या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्याचे लाभ जमा करावयाच्या बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही बाबी स्वतः लाभार्थीने परिपुर्ण केल्याशिवाय त्यास पुढील हप्त्याचा लाभ अदा होणार नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षातून 3 वेळा सदर योजनेचा प्रत्येकी 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षातुन 6 हजार रुपये देण्यात येतात. आगामी 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर जाऊन आधार बँक खात्याला संलग्न करून घ्यावे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. सदर बँक खाते 48 तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील प्रत्येक पोस्टात उपलब्ध आहे.
याशिवाय पीएम किसान ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान जिओआय अॅप डाउनलोड करावे. ज्यांचेकडे जुने पीएम किसान अॅप असेल त्यांनी त्याऐवजी पीएम किसान ॲप 2.0 हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून फेस ऑथेंटीकेशन द्वारे स्वतःसह इतर 50 जणांचे ईकेवायसी करू शकणार आहेत. यानंतरही योजनेचा 14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यास अडचण आल्यास नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही विभागीय कृषी सहसंचालक श्री. वाघ यांनी कळविले आहे.
PM Kisan Amount Threat Agriculture Department