इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या कोरोनामुळे भारतासह अनेक देशात लग्नकार्यावर निर्बंध आहेत. काही ठिकाणी केवळ २५ तर काही ठिकाणी ५० वा १०० जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ करावे लागत आहेत. कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांची दखल घेत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन (वय ४०) यांनी त्याचा प्रस्तावित विवाह सोहळा लांबणीवर टाकला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जेसिंडा या लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये आहेत. त्यातच त्या न्यूझीलंडच्या पंतप्रधानही बनल्या. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. जेसिंडा आणि त्यांचे बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड हे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. न्यूझीलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उन्हाळ्याचा मानला जातो. याच काळात अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, कोरोना निर्बंधांची दखल घेत जेसिंडा यांनी त्यांचा विवाह सोहळाच पुढे ढकलला आहे.
जेसिंडा याा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच गरोदर होत्या. काही वर्षांपासून त्या बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. २०१९ मध्ये जेसिंडा आणि क्लार्क यांचा साखरपुडा झाला होता. मात्र आता मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विशेष म्हणजे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने लग्नाआधी बाळाला जन्म देण्याचे उदाहरण फारसे आढळत नाही. परंतु न्यूझीलंडमध्ये त्याची फारशी चर्चा झाली नाही. मुलीच्या जन्मानंतर जेसिंडा यांचे बॉयफ्रेंड गेफोर्ड यांनी घरी राहून मुलीचा सांभाळ केला, तर जेसिंडा या देशाची धुरा कोरोनाच्या संकटकाळात सांभाळत आहेत. जेसिंडा या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधानही ठरल्या आहेत. जागतिक व्यासपीठावरही जेसिंडा या लहान मुलीला घेऊन गेल्या होत्या. त्यामुळेही त्या अधून मधून चर्चेत राहत असतात.