शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद

by Gautam Sancheti
जून 29, 2025 | 9:07 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 84

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) जाणारे पहिले भारतीय ठरलेल्या ग्रुप कॅप्टन शुभ्रांशु शुक्ला यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की शुभांशु शुक्ला सध्या भारतीय मातृभूमीपासून सर्वात दूर असले तरी ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या सर्वाधिक समीप आहेत. शुभांशु यांच्या नावातच शुभत्व आहे आणि त्यांची ही अंतराळ यात्रा एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी म्हणाले की हे दोन व्यक्तींमधील संभाषण असले तरी ते १४० कोटी भारतीयांच्या भावना आणि उत्साह व्यक्त करत आहे. शुभांशु यांच्याशी बोलणारा हा आवाज संपूर्ण देशाचा सामूहिक उत्साह आणि अभिमान घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले, आणि अवकाशात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांनी शुभांशु यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी शुभांशु यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अंतराळ स्थानकावर सर्व काही ठीक आहे का, याची चौकशी केली.

पंतप्रधानांना प्रतिसाद देताना, अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी १४० कोटी भारतीयांच्या वतीने शुभेच्छांबद्दल आभार मानले आणि सांगितले की त्यांची तब्येत ठीक असून मिळालेले प्रेम आणि आशीर्वादाने ते खूप भारावून गेले आहेत. त्यांनी कक्षेत घालवलेला काळ एक सखोल आणि नवीन अनुभव असल्याचे सांगितले, जो केवळ त्यांचा वैयक्तिक प्रवास नसून भारत ज्या दिशेने प्रगती करत आहे तेही दर्शवत असल्याकडे लक्ष वेधले. पृथ्वीपासून कक्षेपर्यंतचा त्यांचा ४०० किलोमीटरचा प्रवास हा कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे, असे शुक्ला यांनी नमूद केले.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की आपण कधीही अंतराळवीर बनण्याची कल्पना केली नव्हती, परंतु पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आजचा भारत अशी स्वप्ने साकार करणे शक्य करत आहे. शुभांशु यांनी ही एक मोठी कामगिरी असल्याचे सांगितले आणि अवकाशात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला खूप अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

पंतप्रधानांनी मिष्कील टिप्पणी करताना सांगितले की शुभांशु अवकाशात असले तरी, जिथे गुरुत्वाकर्षण जवळजवळ नाही, तिथेही ते किती जमिनीवर आहेत हे प्रत्येक भारतीय पाहू शकतो. त्यांनी विचारले की शुभांशु यांनी भारतातून नेलेला गाजराचा हलवा त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना दिला होता का?

शुभांशु शुक्ला यांनी सांगितले की त्यांनी अंतराळ स्थानकावर अनेक पारंपरिक भारतीय पदार्थ नेले होते, ज्यात गाजराचा हलवा, मुगाच्या डाळीचा हलवा आणि आमरस यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना भारताच्या समृद्ध पाककलेचा वारसा चाखायला देण्याचा आपला उद्देश व्यक्त केला. त्यांनी सर्वांनी एकत्र बसून या पदार्थांचा आस्वाद घेतला, जे त्यांना खूप आवडले, अशी माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना या पदार्थांची चव इतकी आवडली की काहींनी भविष्यात हे पदार्थ भारतीय भूमीवर चाखण्यासाठी भारताला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सांगितले की प्रदक्षिणा (परिक्रमा) ही शतकानुशतके भारताची एक पूज्य परंपरा राहिली आहे आणि शुभांशु यांना आता पृथ्वीमातेचीच प्रदक्षिणा करण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले आहे. शुभांशु या क्षणी पृथ्वीच्या कोणत्या भागावरून फिरत आहेत, असे त्यांनी विचारले.

त्यावर उत्तर देताना, या अंतराळवीराने सांगितले की त्यांना त्या क्षणी ते नेमके कोणत्या स्थानावर आहेत ते लक्षात येत नसले तरी, थोड्या वेळापूर्वीच त्यांनी खिडकीतून पाहिले असता ते हवाई बेटांवरून जात होते. त्यांनी सांगितले की ते दिवसातून १६ वेळा पृथ्वीची परिक्रमा करतात – म्हणजेच, अवकाशातून 16 वेळा सूर्योदय आणि १६ वेळा सूर्यास्त पाहतात – हा अनुभव त्यांना अजूनही आश्चर्यचकित करतो.

त्यांनी माहिती दिली की ते सध्या जवळपास २८ हजार किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असले तरी अंतराळयानाच्या आत ही गती जाणवत नाही. मात्र या प्रचंड वेगाचे प्रतिकात्मक प्रतिबिंब भारत आज ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यात दिसते, असे त्यांनी सांगितले.

शुभांशु शुक्ला यांनी सांगितले की कक्षेत (orbit) प्रवेश केल्यावर आणि अवकाशाची विशालता पाहिल्यावर त्यांच्या मनात आलेला पहिला विचार पृथ्वीचे दृश्य कसे आहे, याबदद्ल होता.

ते म्हणाले की अवकाशातून सीमा दिसत नाहीत—राष्ट्रांमध्ये कोणतीही दृश्यमान सीमारेषा नसते आणि सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ग्रहाचा निव्वळ एकसंधपणा.

आपण नकाशे पाहताना देशांच्या, ज्यात भारताचाही समावेश आहे, आकारांची तुलना करतो आणि अनेकदा एक वेगळेच चित्र पाहतो, कारण आपण त्रिमितीय जगाला कागदावर सपाट करत असतो. पण अवकाशातून, शुभांशु म्हणाले, भारत खरोखरच भव्य दिसतो – प्रमाणात आणि आपल्या भावनेतही तो राजबिंडाच वाटतो.

त्यांनी अनुभवलेल्या एकतेच्या जबरदस्त भावनेचे आणखी वर्णन केले — एक शक्तिशाली जाणीव जी भारताच्या “विविधतेतील एकता” या नागरी सभ्यतेच्या घोषणेशी पूर्णपणे जुळणारी आहे. सर्वांनी परस्परांमध्ये वाटून घेतलेले पृथ्वी हे सर्वांचे एकच घर आहे असे दृश्य, जे मानवतेला आपल्यात असलेल्या नैसर्गिक सुसंवाद आणि परस्परसंबंधांची आठवण करून देते.

शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय असल्याची बाब पंतप्रधानांनी या संवादात अधोरेखित केली. त्यांनी शुभांशु यांची पृथ्वीवरील कठोर तयारी आणि अंतराळ स्थानकावरील वास्तविक परिस्थिती यातल्या फरकाबद्दल विचारपूस केली. यावर शून्याकर्षण (zero gravity) आणि प्रयोगांचे स्वरूप आधीपासूनच माहित असूनही, अंतराळ कक्षेतली वास्तविक परिस्थिती पूर्णपणे वेगळी वाटत असल्याचा अनुभव अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी पंतप्रधानांसोबत सामायिक केला. गुरुत्वाकर्षणाची मानवी शरीराला इतकी सवय असते की सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत (microgravity) अगदी छोटी छोटी कामेही अनपेक्षितपणे गुंतागुंतीची होऊन जातात, असे त्यांनी नमूद केले. आपल्याला स्वतःचे पाय बांधून ठेवावे लागत होते, नाहीतर ते तरंगत राहीले असते हा अनुभवही त्यांनी या संवादादरम्यान पंतप्रधानांना विनोदाने सांगितला. अंतराळात पाणी पिणे अथवा झोप घेण्यासारखी साधी साधी कामे देखील खूप मोठी आव्हानांसारखी वाटू लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. इथे दिशाच निश्चित नसल्याने छतावर, भिंतींवर किंवा कुठेही झोपता येत असल्याची बाबही त्यांनी पंतप्रधानांना समजावून सांगितली. या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एक-दोन दिवस लागतात, पण हा विज्ञान आणि आश्चर्य वाटायला लावणार्‍या घडामोडींची सुंदर सांगड असल्याचा अनुभव त्यांनी पंतप्रधानांना सांगितला.

पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला यांना ध्यानधारणा आणि मनाच्या एकाग्रतेचा त्यांना फायदा झाला का, याबाबतही विचारणा केली. त्यावर, विज्ञान आणि अध्यात्म हे भारताच्या सामर्थ्याचे दुहेरी आधारस्तंभ आहेत, या पंतप्रधानांच्या मताशी शुभांशु शुक्ला यांनी पूर्णपणे सहमती दर्शवली. भारत आधीपासूनच वेगाने प्रगती करत असून, आपली ही मोहीम म्हणजे देशाच्या एका मोठ्या राष्ट्रीय वाटचालीतले पहिले पाऊल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अनेक भारतीय अंतराळात पोहोचतील, यात भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानकही स्थापन झालेले असल्याचे आपण पाहात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मनाच्या एकाग्रतेची महत्त्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. कठोर प्रशिक्षणाचा काळ असो की प्रक्षेपणाच्या वेळचा अती ताणाचा क्षण असो, अशावेळी मनाच्या एकाग्रतेमुळेच मनःशांती आणि स्पष्टता राखण्यात मदत होत असल्याचे शुभांशु यांनी सांगितले. अंतराळात योग्य निर्णय घेण्यासाठी मानसिकदृष्ट्या स्थिर राहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे सांगतांना त्यांनी पळताना कोणीही खाऊ शकत नाही या भारतातील गर्भित म्हणीचा संदर्भही दिला. व्यक्ती जितकी शांत असेल तितके चांगले निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी अधोरेखित केले. विज्ञान आणि मनाच्या एकाग्रतेचा एकत्रितपणे सराव केला तर अशा आव्हानात्मक वातावरणाशी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जुळवून घ्यायला खूपच मदत होत असल्याची बाबही शुभांशु यांनी पंतप्रधानांसोर नमूद केली.

भविष्यात अंतराळात केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रयोगाचा कृषी किंवा आरोग्य क्षेत्राला फायदा होईल का, याबाबतही पंतप्रधानांनी शुभांशु यांना विचारले. त्यावर प्रतिसाद देताना शुभांशु शुक्ला यांनी भारतीय वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच केलेल्या सात अद्वितीय प्रयोगांच्या रचना आपण अंतराळ स्थानकात नेल्या असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. आजच्या दिवशी स्टेम पेशींवर केंद्रित असलेला पहिला प्रयोग केला जाणार असल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. गुरुत्वाकर्षणाच्या अभावाच्या स्थितीत शरीरातल्या स्नायूंचा ऱ्हास होत असतो, एखादा विशिष्ट पूरक आहार हा ऱ्हास रोखू शकतो किंवा त्याची प्रक्रिया लांबवू शकतो का, हे तपासणे हा या प्रयोगाचा उद्देश असल्याचेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. या अभ्यासातले निष्कर्ष थेट ज्यांना वयोमानानुसार स्नायूंच्या ऱ्हासाला होण्याच्या समस्येशी झुंझावे लागते, अशा पृथ्वीवरच्या वृद्ध लोकांना मदतीचे ठरू शकतात ही बाब त्यांनी या संवादातून अधोरेखित केली. दुसरा प्रयोग हा सूक्ष्मशैवालांच्या (microalgae) वाढीवर केंद्रित असल्याचेही त्यांनी सांगितले. सूक्ष्मशैवाल आकाराने लहान असले तरी ते अत्यंत पौष्टिक असल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. अंतराळातील या प्रयोगाच्या निष्कर्षांच्या आधाराने अशा शैवालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची पद्धत विकसित करता आली, तर पृथ्वीवरील अन्न सुरक्षेला मोठी मदत होऊ शकते अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. अंतराळात प्रयोग केल्याने जैविक प्रक्रियांचा वेग वाढवण्याचा मोठा फायदा मिळतो, यामुळे संशोधकांच्या हाती पृथ्वीपेक्षा लवकर निष्कर्ष मिळतात, अशा शब्दांत त्यांनी अंतराळातील प्रयोगांचे महत्त्वही अधोरेखित केले.

चांद्रयानाच्या यशानंतर, भारतातील मुलांमध्ये आणि युवा वर्गात विज्ञानाच्या क्षेत्राबद्दल तसेच अंतराळ संशोधनाबद्दलची आवड वाढली असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी शुभांशु यांच्यासमोर मांडले. शुभांशु शुक्ला यांच्या या ऐतिहासिक प्रवासानेही हाच संकल्प अधिक दृढ केला असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. आत्ताची मुले आता आकाशाकडे केवळ पाहत नाहीत तर त्यांच्यात आपणही तिथपर्यंत पोहचू हा विश्वास निर्माण झाला असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. ही मानसिकता आणि आकांक्षा भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा खरा आधारस्तंभ असल्याची बाब त्यांनी या संवादात अधोरेखित केली. यानिमित्ताने पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला यांना, त्यांना भारताच्या युवा वर्गाला काय संदेश द्यायला आवडेल याबाबतही विचारले. यावर प्रतिसाद म्हणून, शुभांशु शुक्ला यांनी भारतातील युवा वर्गाला संबोधित केले. आपला देश धाडसी आणि महत्त्वाकांक्षी दिशेने वाटचाल करत असल्याचा उल्लेख त्यांनी अभिमानाने केला. ही स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रत्येक युवा भारतीयाचा सहभाग आणि वचनबद्धता गरजेची असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यशाचा कोणता एकच निश्चित मार्ग नसून, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गावरून वाटचाल करू शकते, पण या सगळ्यात चिकाटी हा घटक समान असतो हे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी युवा वर्गाला कधीही प्रयत्न करणे थांबवू नका असे आवाहन केले. तुम्ही कुठेही असाल किंवा कोणताही मार्ग निवडला असाल, पण जर हार मानली नाहीत तर लवकर वा उशिरा पण यश नक्कीच मिळेल असा संदेश त्यांनी दिला.
पंतप्रधान म्हणाले की शुभांशु शुक्ला यांच्या शब्दांनी भारतातील तरुणाईला नक्कीच मोठी प्रेरणा मिळेल. त्यांनी नमूद केले की नेहमीप्रमाणे, कोणतीही बातचीत गृहपाठ न देता ते कधीच संपवत नाहीत. भारताने मिशन गगनयानसह पुढे वाटचाल करावी, स्वतःचे अंतराळ स्थानक उभारावे आणि एका भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्याचे स्वप्न साकार करावे, असे त्यांनी अधोरेखित केले. शुभांशुचे अंतराळातील अनुभव हे या भावी मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असे त्यांनी अधोरेखित केले. शुभांशु आपल्या मोहिमेदरम्यानची निरीक्षणे आणि ते काय शिकत आहेत, ते मनापासून नोंदवत आहेत, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

शुभांशु शुक्ला यांनी सांगितले की प्रशिक्षणापासून सुरू झालेली ही मोहिम असो की अन्य काही, त्यांनी प्रत्येक शिकवण स्पंजसारखी आत्मसात केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की या अनुभवातून मिळालेल्या धड्यांचा भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांसाठी मोठा उपयोग होईल. ते म्हणाले की परतल्यानंतर हे सगळे ज्ञान पूर्ण समर्पणाने वापरून अभियानाची अंमलबजावणी गतीने पूर्ण केली जाईल. त्यांनी सांगितले की या मोहिमेत सहभागी असलेल्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी गगनयानमध्ये सहभागी होण्याची शक्यता विचारली आणि ही गोष्ट त्यांना खूप प्रेरणादायक वाटली, त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले – लवकरच. शुभांशु यांनी हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि त्यासाठी त्यांनी आपले शंभर टक्के योगदान देण्याचे वचन दिले आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

शुभांशु शुक्ला यांचे संदेश भारतीय तरुणाईला प्रेरणा देतील, याबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना मोदी यांनी मोहिमेपूर्वी शुभांशु व त्यांच्या कुटुंबीयांशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली आणि नमूद केले की त्यांचे कुटुंबीयही भावनांनी भारावलेले आणि उत्साहाने भारलेले होते. शुभांशुशी संवाद साधताना त्यांना झालेला आनंद त्यांनी व्यक्त केला आणि सांगितले की सध्या 28000 किलोमीटर प्रतितास या वेगाने काम करताना त्यांच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधानांनी सांगितले की गगनयान मोहिमेच्या यशाचे हे पहिले प्रकरण आहे. त्यांनी नमूद केले की शुभांशुचा ऐतिहासिक प्रवास फक्त अंतराळापुरता मर्यादित नाही, तर भारताच्या विकसित राष्ट्र होण्याच्या वाटचालीला वेग देणारा आणि बळकटी देणारा आहे. “भारत आता जागतिक स्तरावर अंतराळ क्षेत्रात नवी क्षितिजे धुंडाळत आहे आणि भविष्यातील उड्डाणांसाठी केवळ झेप घेणार नाही, तर स्वतःची उड्डाणस्थळेही उभारणार आहे,” असेही मोदी म्हणाले. त्यांनी शुभांशुला सांगितले की कोणताही प्रश्न विचारला नसला तरी त्यांच्या मनात जे काही असेल ते मोकळेपणाने बोलावे, कारण संपूर्ण देश त्यांच्या भावना ऐकण्यास उत्सुक आहे.

शुभांशु शुक्ला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि अंतराळप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर किती मोलाची शिकवण मिळाली याचे चिंतन केले. त्यांनी सांगितले की वैयक्तिक स्तरावर हे मोठे यश आहेच, पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशासाठी ही एक सामूहिक यशाची बाब आहे. त्यांनी देशातील प्रत्येक मुला-मुलीला आणि युवकांना उद्देशून म्हटले की स्वतःसाठी उज्ज्वल भविष्य घडविणे हे भारताचे भविष्य घडविण्यासाठीच आहे. त्यांनी म्हटले की, “आकाश कधीच मर्यादा नव्हते” त्यांच्यासाठी नाही, इतरांसाठी नाही आणि भारतासाठीही नाही. त्यांनी तरुणांना यावर कायम विश्वास ठेवण्याचे आवाहन केले कारण हाच विश्वास त्यांच्या व भारताच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. पंतप्रधानांशी, आणि त्यांच्या माध्यमातून 140 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. एक खास गोष्ट नमूद करताना त्यांनी सांगितले की त्यांच्या येण्याआधी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारतीय राष्ट्रध्वज नव्हता. तो त्यांच्या आगमनानंतरच फडकवला गेला, आणि म्हणूनच तो क्षण त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आणि गौरवशाली होता. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचे अस्तित्व पाहणे ही त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

पंतप्रधानांनी शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सर्व सह-अंतराळवीरांना त्यांच्या मोहिमेच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की संपूर्ण देश त्यांच्या परतीच्या प्रतिक्षेत आहे, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. पंतप्रधानांनी शुभांशुला भारतमातेचा मान कायम राखत राहण्याचे आवाहन केले आणि 140 कोटी देशवासीयांच्या वतीने असंख्य शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी शेवटी सांगितले की शुभांशु यांना या उंचीवर पोहोचण्यासाठी जे परिश्रम आणि समर्पण लागले, त्याबद्दल ते अत्यंत ऋणी आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत सीमाशुल्क विभागाने ५.११ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा केला जप्त

Next Post

ईडीचे या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सीट ब्लॉकिंग घोटाळ्याशी संबंधित १७ ठिकाणी छापे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 16

ईडीचे या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सीट ब्लॉकिंग घोटाळ्याशी संबंधित १७ ठिकाणी छापे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011