नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची गौरवशाली ५० वर्षे पूर्ण केले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.
सोशल मीडियावर केलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की. चित्रपटसृष्टीमध्ये ५० वर्ष गौरवशाली कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांतजी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहिला असून, त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांनी पिढ्यान्-पिढ्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला आहे. आगामी काळातही त्यांना सतत यश मिळावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी शुभेच्छा.
शिवाजीराव गायकवाड, जे व्यावसायिकदृष्ट्या रजनीकांत म्हणून ओळखले जातात, त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते मराठी भाषिक आहेत, पण त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले नाही. ते दक्षिणेकडील (तमिळ) चित्रपटसृष्टीतील एक मोठे सुपरस्टार आहेत आणि त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रजनीकांत विषयी…
रजनीकांतचे जन्मनाव शिवाजीराव गायकवाड असून त्याची मातृभाषा मराठी आहे. तो आजही घरी मराठी बोलतो. पण, त्याची मराठी थोडी वेगळी असल्याचे तो सांगतो. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर त्याने बस कंडक्टर म्हणूनही काम केले. त्यानंतर तो अभिनेता झाला व नंतर तो सुपरस्टार. त्याने तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, अद्यापही त्याने एकाही मराठी चित्रपटात काम केले नाही. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक त्याला मानले जाते.