नवी दिल्ली – बंगळुरूचा विद्यार्थी असलेल्या स्टीव्हन हॅरिसच्या पत्राला उत्तर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे आणि त्याच्या पेंटिंगचे कौतूक केले आहे. या २० वर्षांच्या युवकाने पंतप्रधान मोदी यांची स्वतः काढलेली दोन चित्रे आणि एक पत्र त्यांना पाठवले होते. त्यावर, मोदी यांनी त्याला प्रोत्साहन देणारे आणि कौतूक करणारे उत्तर दिले आहे. स्टीव्हनसारख्या युवकांना सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रांमध्ये असलेली रुचि आणि समर्पण अत्यंत आनंददायी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “तुझ्या पेंटिंगमधून तुझे कलेतील नैपुण्य आणि गोष्टींचा सखोल अनुभव घेण्याचे कौशल्य दिसते. या पेंटिंग्जमधील बारकावे खरोखरच कौतुकास्पद आहेत.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या युवा कलाकाराने आपल्या पत्रात, सार्वजनिक आरोग्य आणि सध्याच्या कठीण काळात लोकांच्या कल्याणाबाबत व्यक्त केलेली भावना आणि मते यांचेही पंतप्रधानांनी कौतूक केले आहे. “लसीकरण मोहीम, शिस्त आणि १३० कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ मिळते आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या उत्तरात लिहिले आहे. सकारात्मकतेचा प्रसार करण्याच्या स्टीव्हनच्या प्रयत्नांपासून लोक प्रेरणा घेतील अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. स्टीवनने आपल्या पत्रात पंतप्रधानांना सांगितले की तो गेल्या १५ वर्षांपासून पेंटिंग करतो आहे आणि विविध स्तरावर त्याने, १०० पुरस्कार जिंकले आहेत. पंतप्रधान आपले प्रेरणास्थान असल्याचे नमूद करत स्टीव्हनने कोरोना विरुद्धच्या भारताच्या लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली आहे.
स्टीव्हन हॅरिसने पाठवलेली पेंटिंग्ज खाली बघता येतील.