नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रमुख उपक्रमासाठी 3.5 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या विक्रमी सहभागासह नोंदणी प्रकिया पूर्ण झाली आहे. परीक्षेशी संबंधित तणावाचे शिक्षण आणि आनंदाच्या उत्सवात रूपांतर करणारी ही एक देशव्यापी चळवळ आहे. परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 व्या पर्वाने संपूर्ण भारत आणि परदेशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या नोंदणीच्या बाबतीत एक अभूतपूर्व टप्पा ओलांडला आहे. हा उल्लेखनीय प्रतिसाद खऱ्या अर्थाने जनचळवळ म्हणून या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता अधोरेखित करतो.
‘परीक्षा पे चर्चा’ 2025 साठी ऑनलाइन नोंदणी MyGov.in पोर्टलवर 14 डिसेंबर 2024 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात आणि परीक्षांप्रति सकारात्मक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यात या उपक्रमाला आलेले यश दर्शवते.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा संवादात्मक कार्यक्रम शिक्षणाचा बहुप्रतीक्षित उत्सव बनला आहे. 2024 मधील ‘परीक्षा पे चर्चा’ चे 7 वे पर्व नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरच्या भारत मंडपम येथे टाऊन हॉल स्वरूपात आयोजित करण्यात आले होते आणि त्याची व्यापक प्रशंसा झाली होती.
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाच्या अनुषंगाने, 12 जानेवारी 2025 (राष्ट्रीय युवा दिन) ते 23 जानेवारी 2025 (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती) या कालावधीत शालेय स्तरावर आकर्षक उपक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा उत्सवाच्या रूपाने साजऱ्या करण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. हे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- स्वदेशी खेळांचे सत्र
- मॅरेथॉन दौड
- मिम्स स्पर्धा
- नुक्कड नाटक
- योग आणि ध्यानधारणा सत्रे
- भित्तीचित्रे स्पर्धा
- प्रेरणादायी चित्रपटांचे प्रदर्शन
- मानसिक आरोग्य कार्यशाळा आणि समुपदेशन सत्रे
- सीबीएसई , केव्हीएस आणि एनव्हीएस विद्यार्थ्यांद्वारे कलाविष्कार सादरीकरण
या उपक्रमांद्वारे, ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 उपक्रम लवचिकता, सकारात्मकता आणि शिक्षणातील आनंद या संदेशाला बळकटी देतो , तसेच शिक्षण हे ताण घेऊन करण्याचे काम न ठरता एक प्रवास म्हणून साजरे केले जाईल याची काळजी घेतो.