नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. भगवान सिंहचलम वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी यांना अभिवादन करून मोदी म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादाने 60 वर्षांनंतर देशात सलग तिसऱ्यांदा आपले सरकार निवडून आले आहे.ते पुढे म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर आंध्र प्रदेशात हा त्यांचा पहिला सरकारी कार्यक्रम होता. कार्यक्रमापूर्वी रोड शो दरम्यान भव्य स्वागत केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. आपल्या भाषणात ते म्हणाले की चंद्राबाबू नायडू यांच्या प्रत्येक शब्दाचा आणि भावनेचा मी आदर करतो . नायडू यांनी आपल्या भाषणात नमूद केलेली सर्व उद्दिष्टे आंध्र प्रदेश आणि भारतातील जनतेच्या पाठिंब्याने साध्य करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
“आपले आंध्र प्रदेश हे शक्यता आणि संधींचे राज्य आहे”, असे उद्गार मोदी यांनी काढले. जेव्हा या शक्यता साकार होतील तेव्हा आंध्र प्रदेशचा विकास होईल आणि भारत एक विकसित राष्ट्र बनेल असे त्यांनी नमूद केले. आंध्र प्रदेशचा विकास हे आमचे उद्दिष्ट असून आंध्र प्रदेशातील जनतेची सेवा करणे ही आमची वचनबद्धता आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2047 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट आंध्र प्रदेशने ठेवल्याचे मोदींनी अधोरेखित केले. ते म्हणाले की हे स्वप्न साकारण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने ‘स्वर्ण आंध्र@2047’ उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार आंध्रप्रदेशच्या बरोबरीने काम करत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि लाखो कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार आंध्र प्रदेशला विशेष प्राधान्य देत आहे असे नमूद केले . आज, 2 लाख कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असे सांगत त्यांनी या विकास प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेश आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.
आंध्र प्रदेश, त्याच्या नवोन्मेषी स्वभावामुळे माहिती आणि तंत्रज्ञानासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे असे अधोरेखित करून, “आंध्र प्रदेशने आता भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याची वेळ आली आहे” असे पंतप्रधानांनी नमूद केले. हरित हायड्रोजनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर राहण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून 2023 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले होते असे मोदींनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यात दोन ग्रीन हायड्रोजन हब स्थापन केले जातील, त्यापैकी एक विशाखापट्टणममध्ये असेल.पंतप्रधानांनी सांगितले की, विशाखापट्टणम हे मोठ्या प्रमाणात हरित हायड्रोजन उत्पादन सुविधा असलेल्या जगातील मोजक्या शहरांपैकी एक असेल. हे हरित हायड्रोजन हब (केंद्र) रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करेल आणि आंध्र प्रदेशात उत्पादन परिसंस्था विकसित करेल, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
नक्कापल्ली येथे बल्क ड्रग पार्क प्रकल्पाची पायाभरणी करण्याची आपल्याला संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आंध्र प्रदेश, हे अशा प्रकारचे उद्यान विकसित होत असलेल्या देशातील तीन राज्यांपैकी एक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे पार्क उत्पादन आणि संशोधनासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रदान करेल, तसेच स्थानिक फार्मा कंपन्यांना लाभ मिळवून देत गुंतवणूकदारांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
सरकार, शहरीकरणाला एक संधी मानत असून, आंध्र प्रदेशला नवीन काळातील शहरीकरणाचे उदाहरण बनवण्याचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, ही दृष्टी साकारण्यासाठी, क्रिस सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णापट्टणम औद्योगिक क्षेत्राची आज पायाभरणी करण्यात आली. ही स्मार्ट सिटी, चेन्नई-बंगळूरू औद्योगिक कॉरिडॉरचा भाग असेल, जो हजारो कोटींची गुंतवणूक आकर्षित करेल आणि आंध्र प्रदेशात लाखो औद्योगिक रोजगार निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंध्र प्रदेशला उत्पादन केंद्र म्हणून श्री सिटीचा लाभ मिळत असल्याचे नमूद करून, आंध्र प्रदेशला देशातील औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रातील अव्वल राज्यांपैकी एक बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसारख्या उपक्रमांद्वारे सरकार उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे, परिणामी, विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये भारताची जगातील अव्वल देशांमध्ये गणना होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
विशाखापट्टणमच्या नवीन शहरात दक्षिण कोस्ट रेल्वे क्षेत्रीय मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. आंध्र प्रदेशसाठी या विकासाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, ज्याने या राज्याची स्वतंत्र रेल्वे झोनची दीर्घ काळापासून असलेली मागणी पूर्ण केली. पंतप्रधान म्हणाले की, दक्षिण कोस्ट रेल्वे झोन मुख्यालयाच्या स्थापनेमुळे या प्रदेशात कृषी आणि व्यापार उपक्रमांचा विस्तार होईल, तसेच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. हजारो कोटींच्या कनेक्टिव्हिटी (दळणवळण) प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीचाही त्यांनी उल्लेख केला. आंध्र प्रदेश हे 100% रेल्वे विद्युतीकरण असलेल्या राज्यांपैकी एक असून, या ठिकाणी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 70 हून अधिक रेल्वे स्थानके विकसित केली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील जनतेचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी सात वंदे भारत रेल्वे गाड्या आणि अमृत भारत रेल्वे गाड्या चालवल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आंध्र प्रदेशातील पायाभूत सुविधांमधील क्रांती, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुविधा, राज्याच्या परिप्रेक्ष्यात बदल घडवेल”, पंतप्रधान म्हणाले. हा विकास जीवन सुलभता आणि व्यापार सुलभता वाढवेल, आणि आंध्रप्रदेशच्या 2.5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा पाया रचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी, हा शतकानुशतके भारताच्या व्यापाराचे प्रवेशद्वार आहे, आणि त्याचे महत्त्व कायम आहे, हे लक्षात घेता, या सागरी संधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी नील अर्थव्यवस्थेला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन द्यायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न आणि व्यवसाय वाढवण्यासाठी विशाखापट्टणम मच्छिमार बंदराचे आधुनिकीकरण व्हायला हवे, यावर त्यांनी भर दिला. मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्डसारख्या सुविधांची तरतूद आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला.
विकासाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रत्येक क्षेत्राच्या समावेशक आणि सर्वांगीण विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. केंद्र सरकार समृद्ध आणि आधुनिक आंध्र प्रदेशाच्या उभारणीसाठी देखील कटिबद्ध असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील जनतेच्या भरभराटीची हमी देणाऱ्या, आज उद्घाटन होत असलेल्या प्रकल्पांबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. .