नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजनचे उद्घाटन केले. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे डिव्हीजनच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.
श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी त्यांची शिकवण आणि जीवन, सशक्त आणि समृद्ध राष्ट्राच्या संकल्पनेला प्रेरणा देते, असे सांगितले. कनेक्टिव्हिटीमध्ये भारताच्या वेगवान प्रगतीची प्रशंसा करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, 2025 च्या सुरुवातीपासूनच, भारत 1000 किलोमीटर पेक्षा जास्त मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार करून आपल्या उपक्रमांना गती देत आहे. यावेळी त्यांनी काल सुरू झालेल्या दिल्ली- मेट्रो प्रकल्पासहित अलीकडेच उद्घाटन झालेल्या दिल्ली-एनसीआरमधील नमो भारत ट्रेनचा उल्लेख केला. जम्मू आणि काश्मीर, ओदिशा आणि तेलंगण येथे सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागातील आधुनिक कनेक्टिव्हिटीमध्ये एक मोठी झेप घेतल्याने संपूर्ण देशाने एक पाऊल पुढे टाकल्याचा दाखला आजचा कार्यक्रम देत आहे, असे मोदी म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या विकास प्रकल्पांबद्दल त्यांनी या राज्यांतील लोकांचे आणि भारतातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.
देशभरात समर्पित फ्रेट कॉरिडॉरसारख्या आधुनिक रेल्वे नेटवर्कचे काम वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या विशेष कॉरिडॉरमुळे नियमित रेल्वेमार्गावरचा ताण कमी होतो आणि जलदगती रेल्वेगाड्यांसाठी अधिक संधी निर्माण होत आहेत. मेड इन इंडिया प्रकल्पाला गती देण्याबरोबरच रेल्वेमध्ये कायापालट होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मेट्रो आणि रेल्वेसाठी आधुनिक डब्यांची निर्मिती केली जात आहे. स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे, स्थानकांवर सौर पॅनेल बसवले जात आहेत आणि रेल्वे स्थानकांवर एक स्थानक एक उत्पादन स्टॉल्स उभारले जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे रेल्वे क्षेत्रात लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. गेल्या दशकभरात, रेल्वे मध्ये लाखो तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. नवीन रेल्वेगाडीचे डबे तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये कच्च्या मालाच्या मागणीमुळे इतर क्षेत्रातही नोकरीच्या संधी मिळतात,” असे ते म्हणाले. रेल्वेशी संबंधित विशेष कौशल्ये लक्षात घेत देशात पहिल्या गती शक्ती विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. जसजसे रेल्वेचे नेटवर्क विस्तारात आहे, नवीन विभाग आणि नवीन मुख्यालये उभारण्यात येत आहेत, त्यामुळे जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि लेह-लडाख या प्रदेशांना लाभ होत आहे. रेल्वेविषयक पायाभूत सेवा सुविधांमध्ये जम्मू काश्मीर नवीन टप्पे गाठत आहे, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाविषयी संपूर्ण देशभरात चर्चा आहे. चिनाब या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या रेल्वे कमान सेतूच्या निर्मितीमुळे हा प्रदेश उर्वरित भारताशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावेल आणि लेह लडाख मधील लोकांना सुविधा मिळेल. देशातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल असलेला अंजी खड्ड पुल देखील याच प्रकल्पाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. चिनाब पुल आणि अंजी खड्ड पुल हे या प्रदेशात आर्थिक प्रगती आणण्याचे आणि समृद्धीला चालना देण्याचे अभियांत्रिकीचे एक अद्वितीय उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
ओदिशाला विपुल नैसर्गिक संसाधने आणि लांबच लांब समुद्र किनाऱ्याचे वरदान लाभले असून ओदिशात आंतरराष्ट्रीय व्यापाराची मोठी क्षमता आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ओदिशा राज्यात 70,000 कोटींहून अधिक किमतीचे विविध रेल्वे प्रकल्प सुरू आहेत, यासोबतच 7 गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या स्थापनेचे काम सुरू आहे. असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे ओदिशातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज ओडिशातील रायगडा रेल्वे विभागाची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यामुळे ओडिशा विशेषत: आदिवासी कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या दक्षिण ओडिशामध्ये पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देणारी राज्याची रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन करताना आज पंतप्रधानांनी आऊटर रिंग रोडला जोडून प्रादेशिक विकासाला गती देण्याच्या या प्रकल्पाच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. “आऊटर रिंग रोडला जोडलेले हे स्टेशन या प्रदेशातील विकासाला लक्षणीय चालना देईल,” असे ते म्हणाले. फलाट, लिफ्ट, एस्केलेटर, सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध क्रियांसह स्थानकाच्या आधुनिक सुविधांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले हे एक पाऊल आहे.” असेही ते म्हणाले. या नवीन टर्मिनलमुळे सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचीगुडा येथील सध्याच्या स्थानकांवरचा दबाव कमी होईल, यामुळे लोकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल, हे त्यांनी अधोरेखित केले. असे प्रकल्प केवळ राहणीमानात सुलभता वाढवत नाहीत तर भारताच्या व्यापक पायाभूत सुविधांच्या उद्दिष्टांशी सुसंगत व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देतात, यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारत सध्या एक्स्प्रेसवे, जलमार्ग आणि मेट्रो नेटवर्कसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विस्तार करत आहे, असे ते म्हणाले. 2014 मध्ये असलेल्या विमानतळांची संख्या 74 वरून आज 150 वर पोहोचली आहे आणि मेट्रो सेवा 5 शहरांवरून देशभरातील 21 शहरांपर्यंत विस्तारली आहे, असेही त्यांनी सांगितले. “हे प्रकल्प विकसित भारताकडे जाणाऱ्या मोठ्या मार्गदर्शक आराखड्याचा भाग आहेत, जे आता या देशातील प्रत्येक नागरिकाचे ध्येय आहे.”, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
भारताच्या वाढीबाबत विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “मला खात्री आहे की आपण एकत्रितपणे या वाढीला आणखी गती देऊ.” त्यांनी या उपलब्धींबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन केले आणि राष्ट्र उभारणीसाठी सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू, केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार, ओडिशाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, तेलंगणाचे राज्यपाल हरी बाबू कंभामपती, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.