नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी गुकेशच्या निर्धार आणि निष्ठेची प्रशंसा केली आणि त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी असेही सांगितले की, योग आणि ध्यानाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल आजचे संभाषण होते.
सोशल मीडियावर एक थ्रेड पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले: “भारताचा अभिमान आणि बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डी. याच्याशी उत्कृष्ट संवाद झाला!
मी गेल्या काही वर्षांपासून त्याच्याशी जवळून संपर्कात आहे आणि त्याचा निर्धार व समर्पण हे मला नेहमीच प्रभावित करत आले आहे. त्याचा आत्मविश्वास खरोखर प्रेरणादायी आहे. काही वर्षांपूर्वीचा त्याचा एक व्हिडिओ आठवतो, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, तो भविष्यात सर्वांत कमी वयाचा विश्वविजेता होईल आणि आज त्याच्या मेहनतीमुळे ती भविष्यवाणी खरी ठरली आहे.”
“आत्मविश्वासाबरोबरच, गुकेश हा शांतता आणि विनम्रतेचेही प्रतीक आहे. विजय मिळवल्यानंतर त्याने मोठ्या संयमाने तो विजय साजरा केला. योग आणि ध्यानाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल आज चर्चा झाली.”
“प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. गुकेशच्या पालकांनी यशापयशात त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे कौतुक केले. हे त्यांचे समर्पण खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण खेळाडूंच्या पालकांना नक्कीच प्रेरणा देईल.”
“गुकेशकडून त्याच्या जिंकलेल्या सामन्यातील मूळ बुद्धिबळ पट मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. डिंग लिरेन आणि गुकेश यांनी स्वाक्षरी केलेला हा बुद्धिबळ पट एक अनमोल आठवण आहे.”