लंडन – ब्रिटनमधील एक प्लंबर त्याने आकारलेल्या फी साठी चांगलाच चर्चेत आहे. एका विद्यार्थ्याच्या घरातील पाईप दुरूस्त करण्यासाठी हा प्लंबर गेला होता. पाईप दुरूस्त झाल्यानंतर त्याने विद्यार्थ्याच्या हातात बिल ठेवले ते थेट ४ लाखांचे. हे बिल पाहिल्यानंतर एश्ले डगलस या विद्यार्थ्याचे डोळेच पांढरे झाले.
एश्ले डगलस हँट्सला राहतो. तो सांगतो, किचनमधील सिंकचा पाईप तुटल्याने माझ्या किचनमध्ये पाणी साचले होते. तो दुरूस्त करण्यासाठी एम पीएम प्लंबर सर्व्हिसेसच्या प्लंबरला बोलावले. त्यानुसार मेहदी पैरवी हा घरी आला. त्याने कामाला सुरुवात करण्यापूर्वीच मी त्याच्याकडे पैशांची विचारणा केली होती. पण, त्याने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आणि कामाला सुरुवात केली. पण काम पूर्ण झाल्यावर त्याने जवळपास ३ हजार ९०० पौंड्सचे बिल माझ्या हातात ठेवले.
एवढेच नाही, तर मी हे बिल लगेच द्यावे यासाठी माझ्यावर दबावही आणला. एश्लेने हा सगळा प्रसंग ‘द सन’ला सांगितला आहे. तर एवढं बिल लावणाऱ्या मेहदीचे म्हणणे आहे की, मी जिथे सेवा देतो, त्या एक तासासाठी १ कोटी देखील चार्ज करू शकतो. आणि याने कोणालाही काही फरक पडू नये, असे मला वाटते. माझे ज्ञान आणि कौशल्य याप्रमाणे मी शुल्क आकारतो.
याबाबत एनडी प्लंबिंग सर्व्हिसच्या नील डगलसचे म्हणणे आहे की, हे काम २५० पौंड्स म्हणजेच २५ हजारांत होऊ शकले असते. पण, एवढे बिल आकारणे यातून हेच स्पष्ट होते की, संबंधित प्लंबर या विद्यार्थ्याला लुटू इच्छितो. या बिलावरून एश्ले पोलिसांत तक्रार दाखल करायचा विचार करतो आहे.