नाशिक – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अंबड व सातपूर येथील पंधरा प्लेटिंग उद्योजकांना कारखाने बंद करण्याच्या नोटिसा प्रदूषण महामंडळातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयमामध्ये काल या उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रदूषण महामंडळात शिष्टमंडळाने उद्योजकांचा कोणताही दोष नसल्याचे निर्दशान आणून दिले. त्यानंतर उद्योगांचा वीज पुरवठा व पाणीपुरवठा बंद करण्याचे दिलेले आदेश थांबवण्याचे निर्देश अधिका-यांनी दिल्याची माहिती आय़माच्या पदाधिका-यांनी दिली आहे. ही कारवाई थांबवल्यामुळे १५ उद्योगांना व इतरही सर्व प्लेटिंगच्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कारवाईबाबत आयमाच्या पदाधिका-यांनी सांगितले की, उद्योजकांना दरवर्षी आपले परवाने नूतनीकरण करायला लागतात ते नूतनीकरण करण्याकरता एप्रिल मध्ये दाखल केले असता ते प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काही तांत्रिक बाबींच्या मुद्द्यांवर नूतनीकरण केले नव्हते, त्या बाबींची पूर्तता उद्योजकांनी करून पुन्हा नूतनीकरणाची अर्ज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास एप्रिल व मेमध्ये दाखल केलेले आहेत. परंतु या चार महिन्यांमध्ये या उद्योजकांच्या कारखान्यांना भेटी न देता व त्याची तपासणी अहवाल हा कुठलाही तयार न करता काही हालचाल न केल्याने वरिष्ठ कार्यालयाने एप्रिल च्या धर्तीवर परवाने नाकारले. हा मुद्दा धरून या उद्योजकांना कारखाने बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, यामध्ये उद्योजकांचा कोणताही दोष नाही हे आज आयमाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सांगितले. आपल्या दप्तर दिरंगाई मुळे उद्योजकांना वेठीस धरू नये व लघुउद्योजक आधीच अडचणीतून जात असताना अशा प्रकारच्या कारवाई करून उद्योग बंद करण्यासाठी प्रदूषण मंडळ आहे का असा जाबही विचारला, त्यानंतर मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा दूरध्वनीद्वारे चर्चा करून या उद्योगांचा वीज पुरवठा व पाणीपुरवठा बंद करण्याचे दिलेले आदेश थांबवण्याचे निर्देश या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेतले. यामुळे आज या १५ उद्योगांना व इतरही सर्व प्लेटिंगच्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांनी आयमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
आज शिष्टमंडळ यामध्ये विश्वस्त समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष वरूण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ. सरचिटणीस ललित बुंब, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे यांच्यासहित प्लेटिंग उद्योग करणारे उद्योजक उपस्थित होते. उप विभागीय अधिकारी दुर्गुळे तसेच प्रादेशिक अधिकारी जोशी व मुंबईतील वरिष्ठ अधिकारी सुपाते साहेब यांच्याशी विस्तृत चर्चा झाली.
काल झाली होती बैठक
याबाबत काल आयमा मध्ये बैठक घेण्यात आली होती सुमारे ५० हून अधिक प्लेटिंग चा व्यवसाय करणारे उद्योजक या बैठकीला हजर होते त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातपूर येथील विभागीय कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करून संबंधित निर्णय घेण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले