मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टीक बंदीचा आदेश लागू केल्यानंतर महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करताना केलेल्या बदलात सुधारणा केली आहे. आता या बंदीतून ६० जीएसएम पेक्षा अधिक जाडीचे नॉन वुव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग्ज व पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटस या वस्तूंना बंदीतून वगळले आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी दिली. सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेत या वस्तूंवर बंदी घातली होती. २०२२ मध्ये या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील या उद्योगात छोट्या प्रमाणावर काम करणार्या सुमारे ६ लाखांहून अधिक युवक व महिलांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने ३१ जुलै, २०२२ रोजी औरंगाबाद येथे या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळी या अधिसूचनेत आवश्यक ती दुरूस्ती करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ची याविषयी सातत्याने पाठपुरावा करून यासंबंधीच्या तज्ञ समितिच्या २५ नोव्हेंबरच्या च्या बैठकीत सादरीकरण केले होते. तसेच त्यानंतर २९ नोव्हेंबरच्या रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत समितीपुढे हे विषय मांडून या वस्तू बंदीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार राजपत्रित अधिसूचना जाहीर केल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. त्याचबरोबर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वात याप्रश्नी पाठपुरावा करण्यात आला.
या निर्णयासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयाचा राज्यातील ६ लाखांहून अधिक युवक व महिलांना जीवनदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत व अधिकार्यांचे ललित गांधी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. या निर्णयामुळे उदयोग क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे बदल अधिसूचनेत
महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल अविघटनशील वस्तूचे अधिसूचनेत हा बदल झाला आहे. २३ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेत नॉन वोवन पॉलीप्रोपलीन बॅग्जच्या एवेजी नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग्स असा नावात बदल केला आहे. ६० ग्रॅम पर स्केअर मीटर पेक्षा कमी जाडीची असेल प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे आवरण ५० मायक्रोनपेक्षा जास्त जाडीचे असेल. पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणार्या प्लास्टिकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवतेवर परिणाम होत असेल, अशा ठिकाणी ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरीअलचा वापर करता येऊ शकणार आहे.
कंपोस्टेबलचे प्रमाणीकरण
कंपोस्टेबल पदार्थापासून बनवण्यात आलेले स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेंनर आदी कंपोस्टेबल पदार्थापासून प्लास्टिक पासून बनविलेल्या, अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागणार आहे. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलोजी आणि केद्रींय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे.
Plastic Ban Relaxation by Government