विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्गा दरम्यान ज्या लोकांनी प्लाझ्मा घेतलेला आहे, त्यांना लस घेण्यासाठी किमान तीन महिने वाट पाहावी. तसेच कोरोनावर मात केलेल्या लोकांना नऊ महिन्यानंतर लस देण्यात यावी, असा सल्ला राष्ट्रीय टास्क फोर्सने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.
कोविड उपचाराच्या नियमांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आल्यानंतर लसीकरणासाठी गठित करण्यात आलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने आढावा बैठक घेतली. त्यात संसर्गातून बरे झालेल्या लोकांना केव्हा लस दिली जावी याबाबत चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधनाबाबत चर्चा केली.
कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर एका व्यक्तीमध्ये ९ महिने अँटीबॉडी आढळत आहेत. त्यामुळे या कालावधीत त्यांना लस घेण्याची गरज नाही. लशीचा एक डोस घेतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीमध्ये अँटीबॉडी तयार होतात, असे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.
दुसरा डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी वाढून त्या शंभर टक्क्यांपर्यंत जातात. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात पहिल्यापासूनच अँटीबॉडी असतात. सहा ते नऊ महिन्यांनंतर त्या कमी होतात. तेव्हा अशा व्यक्तींना नंतर लस देणे परिणामकारक ठरू शकणार आहे.
कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर लस देण्याच्या अंतरावरून सरकारचे तज्ज्ञ योग्य माहिती देऊ शकले नाहीत. बरे झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतर लस घेऊ शकतात, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल गेल्या महिन्यात म्हणाले होते. परंतु गेल्या आठवड्यात ते असेही म्हणाले की कोरोनामुक्त लोक सहा महिन्यांनतर लस घेऊ शकतात.
संसर्गातून बरे झाल्याच्या चार ते आठ आठवड्यानंतर लोकांचे लसीकरण केले जात आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले होते.
कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे ठेवण्याची शिफारस करणार्या राष्ट्रीय टास्क फोर्सचे म्हणणे आहे की, पहिल्या लाटेदरम्यान दुसर्यांना संसर्ग होण्याचा दर ४.५ टक्क्यांपर्यंत होता. संसर्गातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यानंतर लोकांमधील अँटीबॉडी कमी होऊ लागतात, असेही आढळले आहे.
आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्तींनी पूर्णपणे बरे झाल्याशिवाय लस घेऊ नये, अशी शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना केव्हा लस दिली जावी याबाबत अद्याप तज्ज्ञांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही.