मुंबई – राजकुमार हिरानी यांच्या पीके (२०१४) या चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्जची त्यांच्या संग्रहात उल्लेखनीय भर पडली आहे असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने म्हटले आहे. हिराणी हे समकालीन भारतीय चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या विशिष्ट सादरीकरणाद्वारे स्वत: चे एक स्थान निर्माण केले आहे. राजकुमार हिरानी यांनी आज मुंबईत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांना ‘पीके’ या चित्रपटाच्या मूळ कॅमेरा निगेटिव्ह्ज सुपूर्द केल्या.
“या निगेटिव्ह्ज जतन करणे महत्त्वाचे होते आणि मला आनंद आहे की पुण्यात एनएफएआयमध्ये ते जतन केले जाईल. चित्रपट जपले जातील हे सुनिश्चित करणे हे चित्रपट दिग्दर्शकांचे कर्तव्य आहे आणि मी सर्व चित्रपट दिग्दर्शकांना या महत्त्वाच्या कार्यात एनएफएआयला सहकार्य करण्याचे आवाहन करतो, ”असे राजकुमार हिरानी म्हणाले.
एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, “हिराणी यांचे आधीचे लोकप्रिय चित्रपटही एनएफएआयमध्ये जतन केले जात असून यापुढेही आमचे संबंध कायम ठेवताना आम्हाला आनंद झाला आहे . आमच्या संग्रहात पीकेचा समावेश आनंदाची बाब आहे, कारण त्याचे चित्रीकरण सेल्युलॉइडवर करण्यात आले होते . भारतात २०१३-१४ दरम्यान चित्रपटांच्या निर्मितीच्या संदर्भात सेल्युलॉइड ते डिजिटल असा बदल झाला. म्हणूनच, हा चित्रपट जतन करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मगदूम यांनी सांगितले.
मूळ कॅमेरा निगेटिव्ह शिवाय, पीकेच्या रशेस असलेले सुमारे ३०० कॅन आणि थ्री इडियट्स चित्रपटाच्या आउटटेक्स देखील जतन करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. पोस्टर, लॉबी कार्ड आणि हिरानी दिग्दर्शित चित्रपटांची छायाचित्र असलेले छापील साहित्य एनएफएआयला सुपूर्द केले जाणार आहे.
एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असलेले हिरानी आपल्या चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न तरलतेने हाताळण्यासाठी आणि समकालीन मुद्यांविषयी एक नवीन दृष्टीकोन प्रदान करणारे म्हणून ओळखले जातात . राजकुमार हिरानी यांचे मुन्नाभाई एमबीबीएस (२००३), लगे रहो मुन्नाभाई (२००६) आणि थ्री इडियट्स (२००९) या चित्रपटांच्या मूळ निगेटिव्हज देखील एनएफएआयमध्ये जतन केल्या गेल्या आहेत.
राजकुमार हिरानी यांचे लेखन, संपादन व दिग्दर्शन असलेला पीके हा भारतीय समाजातील एक अद्भुत राजकीय उपहास आहे. विधु विनोद चोप्रा आणि हिरानी यांची सहनिर्मिती असलेला पीके चित्रपट भारतात सेल्युलाइडवर चित्रीकरण झालेल्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक आहे. अंधश्रद्धेविषयी भाष्य करताना, परग्रहातून आलेला विचित्र असा पीके, विक्षिप्त मात्र प्रेमळ मार्गाने जगाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.