अक्षय कोठावदे, पिंपळनेर
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरचा भूमिपुत्र अंकुश पाठक याची दुबई येथे होणाऱ्या हॉलीबॉल विश्वचषकासाठी उपकर्णधारपदी निवड झाली आहे. ही निवड ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील असणा-या अंकुशला बालपणापासून हॉलीबॉल या खेळाची आवड आहे. पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील विद्यालयात शिकत असताना इयत्ता सातवी पासून अंकुशला हॉलीबॉल या खेळाची गोडी निर्माण झाली. तेव्हापासून अंकुश हॉलीबॉल या खेळाच्या स्पर्धेत सहभागी होत असे, २०१३ साली अंकुश पहिली तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा खेळला होता. त्यानंतर २०१७ साली राज्यस्तरावर निवड झाली होती. यावेळी अंकुशचा संघ विजेता देखील झाला होता. कसून सराव, सातत्य, जिद्द व चिकाटी यांच्या आधारे अंकुशने राज्यस्तरावर तब्बल सहा वेळेस विजेतेपद पटकावले.
२१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ दरम्यान दुबई येथे वर्ल्ड चॅपियनशिप होणार आहे. २१ डिसेंबर रोजी पहिला सामना भारत विरुद्ध कॅनडा असून हा सामना ,भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळला जाणार आहे. या वर्ल्ड चॅंपियनशिप मध्ये तब्बल १९ देश सहभागी होणार आहेत. भारतीय हॉलीबॉल संघाचा कर्णधार विपिन चहल व उपकर्णधार अंकुश पाठक हे २ अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरचा भूमिपुत्र अंकुश पाठक हा अष्टपैलू खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन शिप मध्ये उपकर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत कौतुकास्पद आहे, ग्रामीण भागातील सर्वसाधारण खेळाडू देखील वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होऊ शकतो हे अंकुशने सिद्ध करून दाखवले आहे.
२०१८ मध्ये अंकुशने पिंपळनेर येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील अनेक संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत सुद्धा अंकुशचाच संघ विजेता ठरला होता, त्याच प्रकारे या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन अंकुशने केले होते.
मार्च २०२१ मध्ये अंकुश ठरला राष्ट्रीय खेल गौरव पुरस्काराचा मानकरी. २३ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते अंकुशला राष्ट्रीय खेल गौरव पुरस्कार मिळाला.
अंकुशला पिंपळनेर येथील कर्म. आ.मा. पाटील विद्यालयातील शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन आहे. या विद्यालयातील क्रीडाशिक्षक एच.के.चौरे, डी. झेड.पाटील, डी.एस. वंजारी, व्ही.ए.दहिते, डी. बी.साळुंखे व बी.जी.देसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच प्रमाणे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी, पिंपळनेर या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र मराठे, धनराज जैन,ए.एस.बिरारीस,सुभाष जैन,एच आर गांगुर्डे , डॉ.विवेकानंद शिंदे( अध्यक्ष, शालेय समिती) व विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य ए.बी.मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. अंकुशने अत्यंत कमी वयात घेतलेल्या गगन भरारीचे पिंपळनेरसह आसपासच्या परिसरातील सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय ,क्रीडा या क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याच प्रकारे रायगड येथील शरद कदम हे अंकुशचे कोच आहेत. त्यांनीदेखील अंकुश चा उत्तम सराव करून घेतला, कैलास जैन( चेअरमन,हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा), बाबा बाविस्कर, धीरज घुले (काठेवाडी), फाईज अहमद बेगमपूरे(सोलापूर), संभाजी अहिरराव, क्रीडा प्रशिक्षक अनिल बोराडे यांचे देखील उत्तम मार्गदर्शन अंकुशला लाभले आहे. अंकुशचे काका राम,पाठक श्याम पाठक ,प्रकाश पाठक व त्याची बहीण डॉ.तेजश्री पाठक(जोशी) व पाहुणे मंगेश जोशी यांनीदेखील अंकुशच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित क.र्म.आ.मा. पाटील विद्यालय पिंपळनेर,दिघावे, बल्हाने या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
गौरवाची बाब
अंकुशची भारतीय हॉलीबॉल संघात उपकर्णधार पदी निवड होणे ही केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशासाठी गौरवाची बाब आहे, त्याचप्रमाणे अंकुशला इथपर्यंत पोहोचताना येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला तरी सुद्धा अंकुशने आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपला भारत देश अंतिम सामना जिंकेलच असा मला आत्मविश्वास आहे.
राजेंद्र पाठक, अंकुशचे वडील( सेवानिवृत्त मुख्याध्यापक )
मनःपूर्वक शुभेच्छा.
ओमीक्रोन या नवीन स्ट्रेनने विदेशात धुमाकूळ माजवला असून अंकुश अशा परिस्थितीत सुद्धा दुबई येथे खेळायला जात आहे त्यामुळे अंकुशची मला खूप काळजी वाटते,अंकुश च्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
प्रतिभा पाठक, अंकुशची आई)
शालेय क्रीडा स्पर्धेत नेहमी अग्रेसर
अंकुश हा बालपणापासूनच अत्यंत सालस वृत्तीचा होता. त्याचप्रमाणे तो शालेय क्रीडा स्पर्धेत नेहमी अग्रेसर असायचा. अंकुश भविष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवेल असा मला आत्मविश्वास होता आणि तो त्याने संपादन करून सिद्ध करून दाखवले.
ए.बी.मराठे, मुख्याध्यापक कर्म.आ.मा. पाटील विद्यालय पिंपळनेर
खेळाडू वृत्तीचा
अंकुश हा बालपणापासूनच खेळाडू वृत्तीचा होता, त्याच्यातील सुप्त गुण पाहून त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन केले,अंकुशला हॉलीबॉल खेळण्याचं एवढ वेडं होतं की हा खेळ खेळण्यास अंकुश च्या आई-वडिलांचा त्याला पूर्ण विरोध होता, मी त्याच्या आई-वडिलांना आव्हान केले की, अंकुशला त्याचे करिअर क्रीडा क्षेत्रातच करू द्या. मला आत्मविश्वास आहे की, अंकुश एक दिवस यशस्वी होईल आणि तो सुवर्ण दिवस आज उगवला आहे.
डॉ. विवेकानंद, शिंदे, अध्यक्ष शालेय समिती
प्रामाणिक व जिद्दी मुलगा
अंकुश हा अत्यंत प्रामाणिक व जिद्दी मुलगा आहे. त्याने अनेक संकटांना सामोरे जाऊन आज हा पल्ला गाठला आहे ,अंकुश पिंपळनेरचे नव्हे तर आपल्या भारत देशाचे नाव संपूर्ण जगात पसरवणार आहे, ग्रामीण भागातील मुलगा आज एका देशाचे प्रतिनिधित्व करतो आहे ही बाब पिंपळनेरकरांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.
डॉ. मीना शिंदे, पिंपळनेर