पिंपळगाव बसवंत: शासनाचा पुढाकार, गावाचा सहभाग या उपक्रमाअंतर्गत व शासनाच्या पुढाकारातून राज्यभर गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानात हिरिरीने सहभाग नोंदविणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने शहरात अभिनव उपक्रम राबवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पर्यावरणदिनी सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेला ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियानात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने हिरिरीने सहभाग नोंदविला होता.या अभियानाच्या माध्यमातून पिंपळगाव ग्रामपालिकेने शहरातील पर्यावरण संतुलित राखण्यासाठी शहरात उद्यान गार्डन, रस्ते सुशोभीकरण, गुलाबी भिंत उपक्रम, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुशोभीकरण, ओझोन पार्क, वृक्ष लागवड, पाण्याची बचत, वेस्टज पाण्याचा पुनर्वापर, एक ना अनेक अभिनव उपक्रम राबविल्यानेच त्या कामाची दखल शासन दरबारी घेऊन पर्यावरण दिनी पिंपळगाव ग्रामपालिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऑनलाइन कार्यक्रमाप्रसंगी निफाडचे आमदार दिलीप बनकर, पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड, सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, सुरेश खोडे, विश्वास मोरे, बाळासाहेब बनकर, रवींद्र मोरे, गणेश बनकर, सोमनाथ मोरे, पं स सदस्य राजेश पाटील, संजय मोरे, अल्पेश पारख, किरण लभडे, आशिष बागुल, सोनाली विधाते,सत्यभामा बनकर, बापू कडाळे, अंकुश वारडे, बाळा बनकर, रामकृष्ण खोडे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, आदी उपस्थित होते.
सर्वस्तरातून कौतुक……
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामविकास अधिकारी यांच्या पुढाकाराने शहरात अभिनव उपक्रम राबविल्याने या उपक्रमाची दखल घेत शासनाने प्रथम पुरस्कार जाहीर केल्याने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.