नाशिक: पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या ‘माझी वसुंधरा’ २०२०-२१ स्पर्धेतील मानकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणी साठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांना सन्मानित करण्यात आले.प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.
दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,पर्यटन, राजशिष्टाचार पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य उद्धव ठाकरे,पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे , विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे राबविण्यात येणा-या या अभियानात शासनाने नाशिक जिल्हयातील १० हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची निवड केली होती. १ जानेवारी ते १५ मे २०२० या कालावधीत पंचतत्वावर आधारीत काम ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आली.
या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम करण्यात आले. यात पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच नदी-नाले यांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे यासारख्या पर्यावरणीय घटकांवर काम करण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतींचा आराखडा तयार करुन ग्रामपंचायतींसाठी जिल्हा व तालुका स्तरावरुन संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड प्रभावी संनियंत्रण केले. पहिल्या टप्पयात सर्व १३ ग्रामपंचायतींची काम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट काम करणा-या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व येवला तालुक्यातील नगरसुल ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष तपासणीसाठी निवड करण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने प्रत्यक्ष तपासणी न करता ऑनलाईन पध्दतीने ग्रामविकास अधिका-यांकडून सादरीकरण व सर्व कामांची ऑनलाईन पाहणी करुन माहिती घेण्यात आली. यामध्ये निफाड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्याने सदरची ग्रामपंचायतीने या अभियाना राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका अशोक बनकर ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून उत्कृष्ट काम केल्याने गावाचा पुरस्कार प्राप्त झाला असून जिल्हयातील इतर ग्रामपंचायतींनीही या वर्षात या अभियानात चांगले काम करुन पर्यावरणयुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले आहे.
…
जिल्हा पर्यावरणसमृध्द करावा
नाशिक जिल्हयातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हयाचा बहुमान वाढविला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणी करिता सन्मानीत करण्यात आले आहे. कोरोना संकटकाळातही ग्रामस्तरीय पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांनी या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्हयामध्ये पर्यावरणाचे चांगले काम केले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृध्द गाव करण्यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन काम करावे व जिल्हा पर्यावरणसमृध्द करावा यासाठी काम करण्यात येईल.
– बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद नाशिक
…