पिंपळगाव बसवंत : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना नाशिक जिल्ह्यातील एक गाव हे मे महिन्यात कोरोना मुक्त झाले आहे. याचे कारण शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश, व्यापक जनजागृती, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन, बाधितांसाठी विलगीकरण कक्ष आणि सामुहिक इच्छाशक्तीला मिळालेली प्रयत्नांची जोड यामुळे गावाला कोरोना मुक्त करण्यात यश आले आहे.
निफाड तालुक्यातील कारसूळ हे २०११ च्या जनगणनेनुसार २२७८ लोकसंख्येचे गाव आहे. गावातील नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती असल्याने व्यवसायाशी निगडीत व्यापारी, मजूर, दुकानदारांच्या माध्यमातून गावात लोकांची रेलचेल असल्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावातील बाधित व कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील प्रथम लक्षणे असलेल्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले.
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलीस निरीक्षक व स्थानिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे वेळोवळी पालन केले. गावातील सर्व कुटुंबाची, आशासेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्या मदतीने तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. कुणाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना कोरोना टेस्ट करून घेण्यास सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी स्वखर्चातून २० बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन केला होता. तेव्हा विलगीकरणाचा पण प्रश्न मिटला होता. रुग्णांना सांगण्यात आले होते की, आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात सुविधा केली आहे.
याच बरोबर कोरोना होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची कशी काळजी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यात आली. माक्स वापरणे, वारंवार हात धुणे, वैयक्तिक काळजी घेण्याबरोबर गावकर्यांचा अनावश्यक वावर कमी करण्यासाठी गावात सकाळ – संध्याकाळ दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने गावबंद, टाळेबंद हा उपक्रम हाती घेतला. शिवाय बसण्याच्या जागेवर, बाकावर व कट्यावर ऑईल टाकले. ज्यामुळे घरातून बाहेर पडले तरी बसयचे कुठे, हा प्रश्न निर्माण केला. अशा अनेक गोष्टींमुळे कारसूळ कोरोना मुक्त केले.
यासाठी सरपंच आशा ताकाटे, उपसरपंच उज्ज्वला गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे, स्वाती काजळे, शामराव शंखपाळ, मनीषा काजळे, पुनम पगार, अमोल ताकाटे, भाऊसाहेब कंक, पालखेड मिरची प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. योगेश शिंदे, लोणवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. राहुल देवरे, ग्रामसेवक राजेंद्र वाघ, तलाठी सिध्दार्थ वाघमारे, पोलीस पाटील रमेश ताकाटे, आरोग्य अधिकारी डॉ. मनोज पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अंबादास धोंडगे, सुभाष विंचू, राजाभाऊ कदम, संतोष निरभवणे, जिजा वसाळ, भाग्यश्री खैरनार, रोहिदास तळले, आशा गट प्रवर्तक प्रिती मालसाणे, पोस्टमन संतोष कडपे, वायरमन कृष्णा साळुंके, कृषी अधिकारी अशोक जायभावे, बिट हावालदार बाळकृष्ण नाठे, मनोज बोराळे, आशा कार्यकर्ती वैशाली कंक, क्लार्क सुरज शेख, शिपाई नंदु गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.
काटेकोर नियमांचे पालन
गावकऱ्यांनी दिलेली साथ, काटेकोर नियमांचे पालन व विलगीकरण केंद्रामुळे रुग्णांना आळा बसला. यासर्व गोष्टींमुळे गाव कोराना मुक्त करण्यास मदत झाली. तसेच, विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या प्रथम लक्षणे असणाऱ्या रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल न केल्याने रुग्णांची पैशांची बचत झाली.
– आशा ताकाटे, सरपंच, कारसूळ
………..
विलगीकरण कक्षामुळे मदत
ग्रामस्थ, दुकानदार व मजूरांनी दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याने तसेच, देवेंद्र काजळे यांनी विलगीकरण कक्ष स्थापन करून दिल्याने गाव कोराना मुक्त करण्यासाठी मदत झाली.
– राजेंद्र वाघ, ग्रामसेवक, कारसूळ
………..
कोरोना मुक्त करण्यासाठी अनेकांचे सहकार्य
कारसूळ गाव कोराना मुक्त करण्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. यामुळे गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य लाभले.
– देवेंद्र काजळे, ग्रामपंचायत सदस्य, कारसूळ