पिंपळगाव बसवंत: शहरातील सुरत शिर्डी महामार्गावरील अंबिका नगर परिसरात अशोक लिलँड कंपनीच्या वाहनाचा व मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील १६ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सुरत शिर्डी महामार्गावरील वणी रोडच्या दिशेने काका पुतण्या शेताच्या मजुरीसाठी मोटरसायकल वरून जात असताना वणीच्या दिशेकडून येणाऱ्या अशोक लिलँड कंपनीच्या वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक मारल्याने दुचाकीवरील सोमनाथ गणपत गायकवाड वय २४ हा जखमी झाला.तर मागे बसलेला केदु दिगंबर गायकवाड वय १६ याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह प्रमोद देवरे, राकेश धोंगडे आदी तपास करत आहे.