नाशिक : मागील वर्षी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने पर्यावरण पूरक अनेक योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता, याही वर्षी माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीने सहभाग घेतला असून ग्रामपंचायत हद्दीतील हेरिटेज ट्रीज (पुरातन वृक्ष)ची गणना पुर्ण केली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे या वृक्षांची नोंद ही ‘गुगल मॅप्स’वर करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील असलेली पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत असून त्यांनी “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) गणना पूर्ण केली आहे. गावाच्या एकुण क्षेत्रफळात १६,५०० वृक्षांचा समावेश असून त्यापैकी ४८० वृक्ष हे पुरातन “हेरीटेज ट्री” (पुरातन वृक्ष) आढळून आले आहेत. यात सगळ्यात जुने २२० वर्षांपूर्वीचे एक वडाचे झाड आढळले असून बाकी वृक्षांचे आयुर्मान देखील १०० ते १५० वर्ष इतके आहे. तसेच ही वृक्ष गणना पूर्ण करून गुगल मॅप्स वर प्रकाशित करण्यात आली आहे. डिजिटल पद्धतीने वृक्षांचे छायाचित्रासह नाव आणि माहिती गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या फेसबुक पेजवर हेरिटेज वृक्षांच्या नोंदीची दखल घेण्यात आली असून पर्यावरण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा म्हैसेकर यांनी याबद्दल फेसबुकवर कौतुक केले आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती अलका (आक्का) अशोकराव बनकर, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांनी यासाठी प्रयत्न केले.