पिंपळगाव बसवंत: सतत वर्दळीचा असलेल्या पिंपळगाव जुना आग्रा महामार्गावरील पोलीस वसाहतीसमोरच महिन्या भरापूर्वी महिलेची दोन तोळ्यांची सोनसाखळी ओरबाडून दुचाकीवरून सैराट झालेल्या दोन आरोपींना मुद्देमालासहित जेरबंद करण्यास पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे. पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव बसवंत शहरातील जुना आग्रारोड पोलीस वसाहतीपासून गावाकडे जाणाऱ्या सुरेखा कृष्णा धोंडगे वय ४७ रा.घोडके नगर पिंपळगाव बसवंत सदर महिलेच्या गळ्यातील जवळपास ६०हजार किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून पलायन केल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली होती.
याबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सदर सीसीटीव्ही फुटेज नगर जिल्ह्यात तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर महिनाभरातच आरोपी संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आले. या आरोपींना संगमनेर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. पोलिसांनी खाक्या दाखवला असता आरोपी अविनाश देविदास केंदळे वय २७, रा.नायगाव ता सिन्नर, व सोनू विश्वनाथ पवार वय २२ रा.नायगाव ता. सिन्नर यांनी पिंपळगाव शहरात महिलेची पोत ओरबाडल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, अधिक तपास करत आहे. अटक प्रसंगी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पो ह अमोल जाधव, संदीप दराडे, मिथुन घोडके, नंदू जाधव, बंटी रिकामे, आदींसह होमगार्ड उपस्थित होते.