पिंपळगाव बसवंत- मराठी साहित्याची थोरवी सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी गावी प्रथमच निमंत्रित कवींच्या उपस्थितीत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या मायभूमीत अर्थात शिरवाडेवणी येथे ग्रामस्थांच्यावतीने जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी म्हणजे उद्या रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शिरवाडेवणी येथील कुसुमाग्रज स्मारकात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निफाड तालुक्याचे आम.दिलीप बनकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जि.प.अध्यक्ष ना.बाळासाहेब क्षीरसागर ,मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती. निलीमाताई पवार,पालखेड गटाच्या जि.प.सदस्य सौ. मंदाकिनी बनकर उपस्थित राहाणार आहेत. तर निफाड तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक नेते माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कविसंमेलतात जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी मधुकर जाधव, प्रा.संदीप जगताप,विष्णू थोरे, विजयकुमार मिठे, संतोष वाटपाडे, प्रा. कैलास सलादे, विवेक उगलमुगले,रविंद्र मालुंजकर, राजेंद्र उगले,राजेंद्र सोमवंशी, सोमनाथ पवार, प्रा.गुरुदेव गांगुर्डे प्रा.किशोर गोसावी, मुकुंद ताकाटे, सचिन गांगुर्डे, दत्ता सोनवणे, शीतल कुयटे, रवींद्र देवरे, जयश्री वाघ, शरद शेजवळ , रावसाहेब जाधव, सागर जाधव, रवींद्र देवरे, संजय मोते, डॉ.शोभा जाधव /बोरस्ते, सरला देशमाने /मोते, काजल आहेर, निर्मला खांगळ /ठोंबरे सहभागी होणार आहेत.या कविसंमेलनाचे आयोजन पत्रकार सुरेशकुमार सलादे करीत आहे.
शिरवाडे वणी या गावी कविवर्य कुसुमाग्रज त्यांचे बालपण गेले. या गावाविषयी त्यांच्या मनात नितांत श्रद्धा होती. त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत अधूनमधून त्यांचे गावाला येणे असत. त्यांच्या जन्मगावी निमंत्रितांचे होणारे हे पहिले कवी संमेलन असून या संमेलनासाठी परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिरवाडेवणी ग्रामपालिकेचे सरपंच शरद काळे, उपसरपंच श्रीमती.प्रतिभा गांगुर्डे तसेच ग्रामपालिकेचे सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.