पिंपळगाव बसवंत – शहरातील निफाड रोड परिसरात धारदार प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत पसरवणा-या संदीप रंगनाथ गांगुर्डे रा.राजवाडा यास पिंपळगाव बसवंत पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जुलै रोजी पो.कॅा संदीप दराडे, मिथुन घोडके मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना शहरातील निफाड रोडवरील एका शॉपिंग सेंटरमागील बाजूस एक अज्ञात इसम धारदार शस्त्र घेऊन दहशद माजवीत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्यासह पोलीस हवालदार पंडित वाघ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संदीप रंगनाथ गांगुर्डे रा.राजवाडा पिंपळगाव बसवंत यास अटक केली. त्याच्याकडून सुमारे दीड फूट लांबीचा धारदार कोयता हस्तगत केला आहे.