पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील ११९ गावांचा जल जीवन मिशन अंतर्गत आराखड्यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली.आराखड्यातील गावांना लवकरात लवकर पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळाली, इगतपुरी, दिंडोरी, येवला व सिन्नर आदि तालुक्यांत जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली व या तालुक्यांतील विधानसभा सदस्य असलेल्या समितीने शिफारस केलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनाना मंजूरी देण्या संदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे दालनात बैठक संपन्न झाली. यात जल जीवन मिशन अंतर्गत आराखड्यामध्ये समावेश झालेल्या गावात पाणी पुरवठा योजना मंजुरी करिता सूचना देण्यात आल्या. मार्च २०२४ पर्यंत शुद्ध, स्वच्छ व शाश्वत पाणी प्रति मानसी ५५ लिटर प्रमाणे, प्रति दिन प्रमाणे पुरविणे हे जल जीवन मिशन कार्यक्रमाचे मूळ उद्धिष्ट असून त्यानुसार योजना तयार करण्यात आलेली आहे. यात ग्रामीण भागातील सर्व शाळा व अंगणवाड्या यांना शाश्वत व शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे.
नवीन योजना – यात टँकरने पाणी पुरवठा होणारी गावे घेणे, गावात पाणी पुरवठा योजना नाहीत अशा गावांचा प्राधान्याने समावेश करणे. त्याचप्रमाणे ज्या गावे वाड्या वस्त्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. या योजनांचा संकल्पन कालावधी संपुष्टात आलेला आहे. तसेच पाणी गुणवत्ता बाधित गावे, संसद आदर्श ग्राम योजना, अवर्षणग्रस्त भागातील गावे तसेच अनुसूचित जाती जमाती बहूल लोकसंख्येची गावे इत्यादी गावाकरिता नवीन योजना हाती घेणे.
रेट्रोफिटिंग अ- पूर्वी दरडोई दररोज ४५ लिटर प्रमाणे पाणी पुरवठा योजना होत्या. त्यात आता वाढ करण्यात येऊन अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज ५५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत किंवा ज्या गावांमध्ये पंपिंग तास वाढवून किंवा पंपिंग मशिनरी मध्ये किरकोळ सुधारणा करून तसेच वाढीव वितरण वाहिन्या आवश्यक असल्यास त्याचा समावेश करून दरडोई दररोज ५५ लिटर पाणी देणे शक्य आहे अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळजोडण्या देणे या कामांचा समावेश सुधारणात्मक पुर्नजोडणी रेट्रोफिटिंग अ अंतर्गत या योजना घेणे.
रेट्रोफिटिंग ब– अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज ५५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम नाहीत अशा ठिकाणी रेट्रोफिटिंग अ व्यतिरिक्त किंवा नमूद केलेल्या कामापेक्षा अधिक कामे उदारणार्थ स्त्रोत विकास, नवीन स्रोताचा शोध, ऊर्ध्व / गुरुत्व वाहिन्या, पाण्याची टाकी बांधणे इत्यादी आवश्यकतेनुसार त्यांचा समावेश करून दरडोई दररोज ५५ लिटर पाणी देणे शक्य आहे अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळजोडणी देणे या कामांचा समावेश सुधारणात्मक पुर्नजोडणी रेट्रोफिटिंग ब या अंतर्गत घेण्यात यावा.
यानुसार वर्गीकरण करण्यात आलेले असून जे गाव वरील वर्गवारीत समाविष्ट आहे त्या नुसार योजना मंजूर होणार आहे. यानुसार तिन्ही वर्गवारीनुसार निफाड तालुक्यातील एकूण ११९ गावांचा व लासलगावसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेचा आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे. जिल्हा समितीने त्या त्या तालुक्यातील सादर केलेल्या आराखड्यातील गावांना पाणी पुरवठा राबविण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या . या बैठकी प्रसंगी आमदार सरोज अहिरे ,आमदार हिरामण खोसकर ,आमदार नितीन पवार आदीजन उपस्थित होते.