पिंपळगाव बसवंत: माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत ग्रामपंचायतीने अभियान काळात केलेल्या कामांचे कौतुक करून शाबासकी दिली.
माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदवीत राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत ,नगरपालिका, महानगरपालिका आदी संस्थांशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी पर्यावरण प्रधान सचिव मनिषा म्हैसकर ,अभिनेता आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने माझी वसुंधरा अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवीत वार्डात उद्यान, पिंक सिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना, ओझोन पार्क, वृक्ष रोपण, स्मशानभूमी सुशोभिकरणं, वेस्टज पाण्याचा पुनर्वापर, आदी उपक्रमांचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संस्थांच्या कामाचे कौतुक केले.
ग्रामपालिकेचे केले कौतुक….
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत शहरात विविध अभिनव उपक्रम राबवित राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त केल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अमीर खान यांनी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.