पिंपळगाव बसवंत: जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात वाढते कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी २१ एप्रिल पासून ते ३० एप्रिलपर्यंत १० दिवसाचा कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय रविवार १८ रोजी झालेल्या व्यापारी व सर्वपक्षीय बैठकीत पिंपळगावकरांनी घेतला.
शहरात कोरोना बधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यावर नियंत्रण व उपाययोजना साठी शहरातील अग्निशामक विभाग कार्यालयात व्यापारी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची ग्रामपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासना समवेत कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार दिलीप बनकर, तहसिलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका कोविड संपर्क प्रमुख चेतन काळे, उपसरपंच सुहास मोरे, मंडल अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव, रामभाऊ माळोदे, सदस्य गणेश बनकर,सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे, सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, संजय मोरे, किरण लभडे, प्रकाश गोसावी, बापू कडाळे, अल्पेश पारख, रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, सुरेश गायकवाड, अंकुश वारडे, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, आदी उपस्थित होते.
ग्रामपालिका, महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनासह स्थानिक व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पिंपळगाव बसवंत शहरात २१ एप्रिल पासून ते ३० पर्यंत १० दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मेडिकल हॉस्पिटल, दूध आदी वगळून सर्व बंद राहणार आहे. सोमवार व शुक्रवार दोन दिवस भाजीपाला, २ ते ५ या वेळेत तर कृषी माल पावडर दुकाने सकाळी ७ ते १२ पर्यंत, तर मटन मार्केट व किरकोळ मांस विक्रेते बुधवार व शुक्रवार दुपारी २ ते ५ या निर्धारित वेळेत सुरू राहणार आहे. जनता कर्फ्युच्या निर्णयास सर्व व्यापारी व पिंपळगावकरांनी एकमत दर्शविल्याने बंद काळात पिंपळगावकरांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने यावेळी केले.
पिंपळगाव शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्याबाबत व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात अली. आमदार दिलीप बनकर यांनी कोविड सेंटरमध्ये नियमित साफसफाई करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या. तर व्यापारी वर्गाने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नो मास्क, नो एन्ट्री, फिजिकल डिस्टनसिंगचे व कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना तहसीलदार शरद घोरपडे यांनी यावेळी केल्या.
व्यापारी असोसिएशनचा निर्णय
आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून व रुग्णसंख्या आटोक्यात यावी यास्तव पिंपळगाव बसवंत शहर किराणा, कटलरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील शहरातील किराणा कटलरी मालाची दुकाने १९ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
…….