म्युकरमायकोसिस आजार व संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटे संदर्भात उपाययोजना करण्याच्याही सुचना
पिंपळगाव बसवंत: कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच निफाड तालुक्यातील पूर्व भागात काही प्रमाणात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले आहे व लहान मुलांसाठी घातक असलेली संभाव्य कोरोनाची तिसऱ्या लाटेचे नियोजन करून उपाययोजना कराव्या अशा सूचना निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी तालुक्यातील अधिकारी वर्गाला केल्या. पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते
आमदार बनकर म्हणाले की म्युकरमायकोसिस या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या प्रमाणे जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे निफाड तालुक्यातील नाक,कान,घसा तज्ञ डॉक्टरांची एक फोर्स तयार करण्यात यावी. तसेच सद्या व मागील काही दिवसांपूर्वी जे कोरोनाबाधित रूग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत होते. त्या रुग्णांची नियमित फेर तपासणी व्हावी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाची घरोघरी जाऊन आशा सेविका, आरोग्य सेवक यांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात यावा. जेणेकरून म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्ण आढळून येतील. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येतील. म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार होण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये कमीत कमी खर्चात उपचार व्हावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले
त्याचप्रमाणे कोरोनाचा तिसरी लाट येणार असल्याचे आरोग्य तज्ञ सांगत आहे या लाटेचा जास्त प्रभाव लहान मुलांना होणार असल्याने तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ यांची टास्क फोर्स तयार करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जिल्हा ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना केअर सेन्टर अशा ठिकाणी लहान मुलांना राखीव बेड आरक्षित करण्याच्या सूचना या प्रसंगी आमदार बनकर यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिल्या
या बैठकीप्रसंगी निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन काळे, डॉ. रोहन मोरे, डॉ.अश्विनकुमार मोरे, रामभाऊ माळोदे आदी उपस्थित होते.