पिंपळगाव बसवंत ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोग निरर्देशानुसार व महसूल विभाग यांच्या वतीने मतदान कार्डला आधार जोड मोहीम सुरू करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड, मोबाईल क्रमांक संलग्न करून निवडणूक आयोगाच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले.
निवडणूक आयोग सूचनेनुसार मतदानाला आधार संलग्न करणे, मतदार यादीतून मयत मतदारांचे नाव वगळणेबाबत पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नायब तहसिलदार गजानन भालेराव, पिंपळगाव बसवंतचे तलाठी राकेश बच्छाव, आदिंसह मतदान क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार शरद घोरपडे पुढे म्हणाले, मतदान कार्डला आधार संलग्न करण्यासाठी पिंपळगाव बसवंत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक वार्डात मतदान क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदार ओळ्खपत्रास आधार जोडणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवाय ज्या नागरिकांना नोंद करण्यात बाबत अडचणी येत आहे. त्यांनी पिंपळगाव परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे आपल्या मतदान ओळ्खपत्रास आधार जोडणी करण्याचे आवाहन पिंपळगाव बसवंत मंडळ व तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.