जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीच्या वतीने देखील आहेरगावची पाहणी
पिंपळगाव बसवंत: शासनाचा पुढाकार, गावाचा सहभाग या ग्रामविकास विभागाच्या स्मार्ट ग्राम योजनेत निफाड तालुक्यातील आहेरगाव ग्रामपंचायतीने गावात अभिनव उपक्रम राबवित तालुकास्तरावर प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरली. आता या ग्रामपंचायतीचा जिल्ह्यातील पहिल्या पंधरा ग्रामपंचायतीत समावेश झाला आहे. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीच्या वतीने देखील आहेरगावची पाहणी करण्यात येऊन गावात झालेल्या कामामुळे समाधान व्यक्त केले आहे.
आहेरगाव हे गाव निफाड तालुक्यात नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शासनाच्या निर्मल ग्राम,स्वछ ग्राम, आदर्श गाव, सानेगुरुजी स्वच्छ शाळा, बचत गट स्थापन करून रोजगार निर्मिती आदी सह अनेक शासनाच्या योजनेत भाग घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या १० लाख रुपये पुरस्काराची योजना आहे. आणि त्यात निफाड तालुक्यात आहेरगाव ग्रामपंचायत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून आता जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये देखील आहेरगाव ग्रामपंचायतचा समावेश झाला असल्याने जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम कमिटीने गावाची पाहणी करून समाधान व्यक्त आहे.
जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी रविंद्र परदेशी ,निफाडचे गटविकास अधिकारी संदिप कराड ,विस्तार अधिकारी सुहास शिंदे , कैलास गादड आदींनी गावची पाहणी केली. यावेळी आहेरगावच्या सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकृष्ण शिंदे,ग्राम पंचायत सद्स्य काशिनाथ मोरे,कृष्णा रसाल,बाळासाहेब गांगुर्डे,गणेश निकम,लता रसाल, धनश्री गवळी, मनीषा मोरे, जनाबाई जाधव, स्वाती बागुल, माजी सरपंच रामराव रसाळ, ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे आदी उपस्थित होते.
गावची विकासाभिमुख वाटचाल…..
निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील व बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे यांनी आहेरगाव ग्राम पंचायतीत सलग वीस वर्षाची सत्ता विकास कामांच्या जोरावर अबाधित राखली. शासनाच्या अभिनव योजनेत सहभाग नोंदवीत गावात विविध विकासकामे पार पडत असल्याने आहेरगावची विकासाभिमुख वाटचाल सुरू आहे.